मागील काही वर्षात मराठी टेलिव्हिजनवर अनेक नवे प्रयोग होत आहेत. त्यातही स्टार प्रवाह वाहिनीवर सातत्यानं नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. 'नशीबवान' आणि 'लपंडाव' या दोन नव्या मालिका नुकत्याच सुरू झाल्यात. त्यानंतर स्टार प्रवाहकडून आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.
( Dashavatar Collection : 'दशावतार'ला 99 चा फायदा! समोर आला कमाईचा टोटल आकडा )
advertisement
काजळमाया असं या मालिकेचं नाव आहे. ही गूढ मालिका असून चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
बिग बॉस मराठी 4चा विजेता अभिनेता अक्षय केळकर या मालिकेच प्रमुख भूमिकेत आहे. अक्षय केळकर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे. मालिका आणि भुमिकेविषयी बोलताना अक्षय केळकर म्हणाला, "माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. आरुष कवी मनाचा आहे. अत्यंत साधा, सरळ, कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा. त्याचा चांगुलपणा ही त्याची ओळख आहे. आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर आहे. पहिल्यांदा गूढ मालिकेत अश्या पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अक्षय केळकरने व्यक्त केली."
काजळमाया या मालिकेविषयी बोलताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, "काजळमाया हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा विषय ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने काजळमाया खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटतेय."
