अभिनयाचा पिढीजात वारसा
दया डोंगरे यांचा जन्म १९४० मध्ये झाला. कलेचा वारसा त्यांना पिढीजात लाभला होता. त्यांच्या आई यमुताई मोडक या नाट्यअभिनेत्री होत्या, तर आत्या शांता मोडक या गायिका होत्या. त्यांच्या पणजोबांचीही कीर्तनकार म्हणून विशेष ओळख होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची सुरुवात केली. पुढे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. लग्नानंतरही त्यांचे पती शरद डोंगरे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी कलाक्षेत्रात आपले काम यशस्वीपणे सुरू ठेवले.
advertisement
मराठी मनोरंजन विश्वातील खाष्ट सासू
दया डोंगरे यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती दूरदर्शनवरील 'गजरा' या मालिकेमुळे. पण, त्यांच्या नकारात्मक आणि खाष्ट सासूच्या भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'नकाब', 'लालची' आणि 'चार दिवस सासूचे' यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपट व मालिकांमधून त्यांनी खाष्ट सासू साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
त्यांच्या खाष्ट, पण मजेशीर सासूच्या भूमिका इतक्या प्रभावी ठरल्या की, त्यांची तुलना हिंदी सिनेसृष्टीतील ललिता पवार यांच्याशी होऊ लागली होती. याशिवाय त्यांनी 'तुझी माझी जमली जोडी रे', 'नांदा सौख्य भरे', 'लेकुरे उदंड झाली', 'आह्वान', 'स्वामी' अशा अनेक लोकप्रिय मालिका आणि नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची उंची सिद्ध केली.
कलाविश्वावर कोसळला दुःखाचा डोंगर
१९९० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांच्या दमदार भूमिकांचा ठसा आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाने कलाजगताचे मोठे नुकसान झाले आहे.
