सिद्धार्थ पहिल्यांदाच इतक्या ताकदीच्या आणि वेगळ्या धाटणीच्या भुमिकेत दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिद्धार्थला मोठ्या पडद्यावर पाहून त्याची बायको भावुक झाली. अभिनेत्री तितिक्षा तावडेला अश्रू अनावर झाले. तितिक्षानं सिद्धार्थला मिठी मारली. नवऱ्याचं कौतुक करत तितिक्षाच्या डोळ्यात पाणी आलं.
advertisement
पुन्हा शिवाजीराजे भोसलेचा प्रीमियर नुकताच पार पडला. या प्रीमियरला सिनेमातून कलाकार त्यांचे कुटुंबीय आणि सिनेक्षेत्रातील अनेक मंडळींनी उपस्थिती लावली होती. सिद्धार्थ बोडकेला मोठ्या स्क्रिनवर महाराजांच्या भुमिकेत पाहून तितिक्षा भारावून गेली. थिएटरच्या बाहेर आल्यानंतर नवऱ्याला मिठी मारून ती रडू लागली. तितिक्षा आणि सिद्धार्थचा हा भावुक क्षण कॅमेरात कैद झाला आहे.
सिद्धार्थ बोडकेने याआधी 'तू अशी जवळी रहा' या मालिकेत काम केलं आहे. बायको तितिक्षाबरोबर त्याने स्क्रिन शेअर केली होती. 'अनन्या' या मराठी नाटकातही त्यानं उत्तम काम केलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेक हिंदी सिनेमातही काम केलं. 'दृष्यम 2', 'देवा', 'जहांगीर नॅशनल युनिव्हरसिटी' सारख्या सिनेमात तो दिसला आहे. 'श्रीदेवी प्रसन्न', 'देवमाणूस', सारख्या मराठी सिनेमातही त्याने काम केलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह या सिनेमात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सयाजी शिंदे हे दिग्गज कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसतील. सिनेमाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांनी लिहिली असून संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत.
महेश मांजरेकर यांच्या आतापर्यंतच्या सिनेमांमधील हा सर्वात बिग बजेट सिनेमा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सिनेमाच्या ट्रेलरनेच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असून हा सिनेमा पहिल्या आठवड्यात किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.
