मॉडेलिंगमध्ये नाव कमावण्याची आकांक्षा बाळगून सूरत शहरात आलेल्या १९ वर्षीय सुखप्रीत कौरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना सूरतच्या सरोली परिसरातील कुंभारिया गावातील 'सारथी रेसिडेन्सी' या सोसायटीत घडली.
सुखप्रीत मूळची मध्य प्रदेशची असून ती काही दिवसांपूर्वीच सूरतमध्ये मॉडेलिंग प्रोजेक्टसाठी आली होती. तिच्यासोबत आणखी तीन तरुणी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होत्या. शनिवारी संध्याकाळी जेव्हा त्यापैकी एक मैत्रीण घरी परतली, तेव्हा तिला सुखप्रीतचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. या दृश्याने तिचा थरकाप उडाला आणि तिने तात्काळ पोलिसांना कळवले.
advertisement
कोणताही सुसाईड नोट नाही
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजाने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला, तरी घटनास्थळी कोणताही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. सुखप्रीतचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. तिचे कॉल डिटेल्स, सोशल मीडियावरच्या संभाषणांचा अभ्यास केला जातोय.
त्या दिवशी एकटीच होती सुखप्रीत
घटनेच्या वेळी सुखप्रीत घरी एकटीच होती. तिच्या मैत्रिणी त्या दिवशी बाहेर गेल्या होत्या. पोलिस सध्या तिच्या मैत्रिणींची सखोल चौकशी करत आहेत. इतकंच नाही, तर सुखप्रीतवर कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव, एखादा वाद किंवा इतर कोणती कारणं तर नाही ना, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुखप्रीतला ओळखणाऱ्या अनेक लोकांनी सांगितले की, ती खूपच हसतमुख, मैत्रीपूर्ण स्वभावाची होती. तिचं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न होतं आणि ती अलीकडे काही प्रोजेक्ट्सबद्दल खूप उत्साही होती. त्यामुळे तिचा अचानक आणि अशाप्रकारे मृत्यू होणं हा तिच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मॉडेलिंग समुदायासाठी धक्कादायक आणि दुःखद आहे.
पोलिसांची चौकशी सुरू
सध्या पोलिस प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून परिवाराला माहिती देण्यात आली आहे. ते सूरतमध्ये पोहोचण्याची प्रतीक्षा सुरू आहे. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा कॉल रेकॉर्ड्स, चॅट हिस्ट्री, वैयक्तिक संबंध आणि सामाजिक घडामोडी यांचा अभ्यास करत आहेत.