'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या सिनेमामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, त्याला या भूमिकेसाठी निवडल्यानंतर अनेकांनी जोरदार विरोध केला होता, असा मोठा खुलासा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केला आहे.
सिद्धार्थ बोडकेच्या कास्टिंगवरून अनेकांचा विरोध
'देवमाणूस' आणि 'दृश्यम २' सारख्या चित्रपटांमुळे सिद्धार्थ बोडकेची ओळख असली तरी, मांजरेकरांनी त्याला महाराजांच्या भूमिकेसाठी निवडले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. एका मुलाखतीत मांजरेकर म्हणाले, "मी त्याला जेव्हा या सिनेमात घेतले, तेव्हा तो 'देवमाणूस'मध्ये नव्हता. तो थिएटर करतो हे मला माहीत होते. मी एकदा त्याला भेटलो आणि मला वाटले की तो या भूमिकेसाठी योग्य आहे."
advertisement
मांजरेकरांनी पुढे सांगितले, "मी त्याला पाहिल्यावरच म्हटले होते की, तू माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराज करतो आहेस. तुला वजन कमी करावे लागेल आणि घोडेस्वारी शिकावी लागेल. तो तयार झाला." मात्र सिद्धार्थचं कास्टिंग अनेकांना पटलं नव्हतं. मांजरेकर पुढे म्हणाले, "मला सर्वांनी विरोध केला की, 'कोणीतरी नाववाला घे...' मी म्हटले की, आपल्याकडे कोणीच नाववाला नाहीये. मला तोच योग्य वाटतोय." मांजरेकरांच्या मते, सिद्धार्थने महाराजांची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे काम त्याने चोख बजावले आहे.
विक्रम गायकवाडसाठीही झगडा
या चित्रपटातील दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अभिनेता विक्रम गायकवाड यांच्या निवडीवरूनही मांजरेकरांना विरोध झाला होता. मांजरेकर म्हणाले, "विक्रम गायकवाड हा गुणी नट आहे. मी त्या पॉवरफुल भूमिकेसाठी विक्रमला घ्यायचे ठरवले, तेव्हाही सर्वांनी विरोध केला." मात्र, मांजरेकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी सांगितले की, "मी मध्ये चॅनेलवाल्यांना सिनेमा दाखवला, तेव्हा सर्वजण म्हणाले की, विक्रम गायकवाडने जबरदस्त काम केले!"
दरम्यान, 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या चित्रपटात सिद्धार्थ बोडके आणि विक्रम गायकवाड यांच्यासह त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, सांची भोयर, पायल जाधव, सिद्धार्थ जाधव, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, शशांक शेंडे आणि मंगेश देसाई अशी तगडी स्टारकास्ट आहे.
