घटना कशी घडली
25 जून 2021 रोजी गजानन जगन्नाथ भोवड (रा. परुळे-सुतारवाडी, ता. राजापूर) याने पत्नी सिद्धी उर्फ विद्या हिला “तुला तुझ्या बहिणीकडे घेऊन जातो” असे सांगून घराबाहेर नेले. दोघे परुळे-सुतारवाडी येथील जंगलमय भागात गेले आणि तिथे गजाननने तिचे नाक व तोंड दाबून गुदमरवून तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गवतात लपवला आणि गावात परत येऊन “भूताने माझ्या बायकोला उचलून नेले” असा खोटा गोंधळ घातला.
advertisement
खोटा बनाव आणि पोलिसांचा संशय
घटनेनंतर आरोपीने राजापूर पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या वर्तनावर संशय आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मौळे यांनी घटनास्थळी तपास करून आरोपीचा बनाव उघड केला. त्याच्याविरुद्ध भादवी कलम 302 (खून), 201 (पुरावा नष्ट करणे) आणि 177 (खोटी माहिती देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घरगुती वाद आणि रागाचा सूड
गजानन आणि सिद्धी हे 2019 मध्ये कोविडकाळात आपल्या गावी परत आले होते. मात्र, घरगुती कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद होत. सिद्धी त्याला वेळेवर जेवण देत नव्हती, मुलांकडे लक्ष देत नव्हती आणि त्याच्या आई-वडिलांबद्दल वाद घालत असे. तसेच गजाननचे इतर स्त्रियांशी संबंध असल्याचा संशय तिला होता. या सततच्या भांडणांमुळे गजाननने रागाच्या भरात पत्नीचा जीव घेण्याचा निर्णय घेतला.
न्यायालयीन निकाल आणि शिक्षा
या खटल्याचा निकाल 10 नोव्हेंबर 2025 रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, राजापूर येथे घोषित झाला. सरकारी बाजू अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी मांडली. खटल्यात 14 साक्षीदार तपासले गेले. आरोपीची बहीण, मेहुणा आणि सरपंच फितूर झाले असले तरी डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे आणि सिद्धीची बहीण सोनाली शिंदे यांच्या साक्षींनी प्रकरणातील पुरावे ठोस केले. न्यायाधीश अनिलकुमार आंबाळकर यांनी आरोपी गजानन भोवड याला – कलम 302 अंतर्गत जन्मठेप व 5,000 रुपये दंड, कलम 201 अंतर्गत 3 वर्षे कारावास व 1,000 रुपये दंड, कलम 177 अंतर्गत 15 दिवस साधा कारावास व 500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दरम्यान, दंडातून मिळणाऱ्या रकमेपैकी 5 हजार रुपये मयत सिद्धीच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांचा तपास आणि पैरवी या प्रकरणाचा तपास राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी केला, तर पैरवीचे काम पोलिस शिपाई विकास खांदारे यांनी पाहिले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली.आवडेल.






