व्यायामाचे हे दोन मुख्य प्रकार आहेत. वजन कमी करण्याचा विचार केल्यास, कार्डिओला नेहमीच स्ट्रेंथ ट्रेनिंगपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. याचे कारण म्हणजे वजन उचलण्यापेक्षा कार्डिओ जास्त कॅलरी बर्न करतो, अशी लोकांची धारणा आहे. मात्र हे चुकीचे आहे. चला तर मग पाहूया वजन कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग कार्डिओइतकेच महत्त्वाचे का आहे आणि ते तुमच्या दिनचर्येत योग्य प्रकारे कसे समाविष्ट करावे. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
कार्डिओचा वजनावर होणार परिणाम..
रनिंग, स्प्रिंटिंग, दोरीवरच्या उड्या मारणे यांसारखे कार्डिओ व्यायाम तुमच्या हृदयाची गती वाढवतात आणि तुम्हाला चालू ठेवण्यासाठी अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. यामुळे तुमच्या वर्कआउटसाठी ऊर्जा मिळवण्यासाठी कॅलरी अधिक जलद जळतात. शिवाय, जर तुम्ही कार्डिओ कमी तीव्रतेने करत असाल, तर तुम्ही तो खूप जास्त वेळ करू शकता. तुम्ही सायकलिंग आणि रनिंग निवडल्यास तुम्हाला व्यायामानंतरही काही प्रमाणात कॅलरी जळण्याचा फायदा मिळतो.
स्ट्रेंथ ट्रेनिंगचा वजनावर होणार परिणाम..
स्ट्रेंथ ट्रेनिंगचा संबंध बहुतेक वेळा स्नायू तयार करणे आणि लीन मास वाढवण्याशी जोडला जातो. पण वजन कमी करण्यासाठीही ते तितकेच प्रभावी आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे व्यायामादरम्यान आणि व्यायामानंतरही 10-12 तास शरीरात कॅलरी जळत राहतात. याशिवाय, स्नायूंचा चयापचय दर चरबीपेक्षा जास्त असतो. यासाठी डेडलिफ्ट किंवा इतर क्लिष्ट वजन उचलण्याचे व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही साधे सोपे वजन उचलण्याचे व्यायाम करूनही स्ट्रेंथ ट्रेनिंगचे फायदे मिळवू शकता.
वजन कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ दोन्ही एकत्र कसे करावे?
जर तुम्ही दररोज फक्त एकाच प्रकारचा व्यायाम करत असाल, तर तुमचे वजन कमी होणे थांबण्याची किंवा व्यायामाची प्रेरणा कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सातत्य राखण्यासाठी व्यायामामध्ये विविधता असणे महत्त्वाचे आहे. कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एका दिवसाआड करावे. वजन कमी करण्यासाठी एका दिवसाआड 40 मिनिटांचे कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पुरेसे आहे. पण जर तुम्हाला दोन्ही व्यायाम एकत्र करायचे असतील, तर प्रभावी परिणामांसाठी आधी स्ट्रेंथ ट्रेनिंग करा आणि नंतर कार्डिओ करा.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.