जाणून घेऊयात आहारतज्ज्ञांकडून हिवाळ्यात पपई खाणं योग्य की अयोग्य?
advertisement
हिवाळ्यात पपई खावी का?
आधी सांगितल्याप्रमाणे पपईच्या बाबतीत मतमतांतरं आहेत. अनेक जण पपईला थंड प्रवृत्तीचं फळ मानतात. त्यामुळे ते हिवाळ्यात पपई खाणं टाळतात. मात्र हे चुकीचं आहे. पपई ही उष्ण स्वभावाची आहे. त्यामुळे हिवाळ्यात पपई खाणं फायद्याचं ठरतं. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत पपईत असलेलं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे विषाणूजन्य संसर्ग आणि हंगामी आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. पपईमध्ये असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे शरीरातील जळजळ कमी व्हायला मदत होते. हिवाळ्यात थंडीमुळे घाम कमी येतो, त्यामुळे आपण पाणी कमी पितो. यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. मात्र पपईमध्ये योग्य प्रमाणात पाणी असल्यामुळे हिवाळ्यातल्या डिहायड्रेशनपासून आपला बचाव होतो. पपईत असलेल्या फायबर्स, जीवनसत्त्वं आणि खनिजांमुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात पपई खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. पपईमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि ए त्वचेसाठी फायदेशीर आहे. एकंदरीत पपई आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय पपई हे वर्षभर मिळणारं फळ आहे. त्यामुळे फक्त हिवाळ्यातच नाही तर वर्षभर पपईचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.
पपईचे फायदे समजून घेतल्यानंतर जाणून घेऊयात पपई खाण्याची योग्य वेळ कोणती ते ?
पपई ही आरोग्यासाठी बहुगणी आहे. त्यामुळे ती कधीही खाता येते. मात्र सकाळी सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणं जास्त फायद्याचं आहे. अन्न पचायला मदत होतेच मात्र पोटही साफ राहतं. दुपारी पपईही खाऊ शकता. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे अशांनी रात्रीच्या वेळी पपई खाणं टाळावं. कारण त्यांना रात्री ॲसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो.
पपई खाण्याची योग्य पद्धत :
पपई खरेदी करताना ती ताजी आणि पिकलेली असेल याची खात्री करा. खाण्यापूर्वी पपई चांगली धुवून आणि सोलून घ्या.मग पपईचे चार उभे भाग करून त्यातल्या बिया काढून टाका. यानंतर, पपईचे लहान तुकडे करून ते खा. याशिवाय तुम्ही पपईचा शेक किंवा स्मूदी बनवू शकता. पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्णही पपई खाऊ शकतात.मात्र एक गोष्ट ध्यानात ठेवा की, पपई खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. दररोज 100 ते 200 ग्रॅम पपई किंवा पपईच्या 2 पूर्ण फोडी खाणं फायद्याचं ठरू शकतं.
कच्ची पपई खाल्ल्याने काय होतं ?
आहारतज्ज्ञांच्या मते, कच्च्या पपईतही अनेक पोषकतत्वे असतात. पिकलेल्या पपईप्रमाणेच कच्ची पपईही आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कच्च्या पपईचा अनेक प्रकारे आहरात समावेश करता येतो.
- कच्च्या पपईची भाजी करून खाता येते.
- जर तुम्हाला पपई फार आवडत असेल तर ती विविध डाळींमध्ये घालूनही खाता येते.
- कच्ची पपई उकडून किंवा सलाडमध्येही टाकून खाता येते.
- कच्च्या पपईची खीर आणि चटणीही सुद्धा बनवता येते.
जास्त प्रमाणात पपई खाण्याचे तोटे :
पपई ही बहुगुणकारी जरी असली तरीही लक्षात ठेवा की ती उष्ण प्रकृतीची आहे, त्यामुळे जास्त पपई खाणे देखील धोक्याचं ठरू शकतं.
- काही लोकांना जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने त्वचेवर पुरळ येतात, किंवा अंगाला सतत खाज येणे यासारख्या त्वचेच्या ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.
- पपईत फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात. योग्य प्रमाणात पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. मात्र अति तिथे माती या म्हणी प्रमाणे जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते.
- पपईमुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत जरी होत असली तरीही जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने नुकसान होतं. यामुळे हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात.
- पपई ही उष्ण प्रकृतीची असल्याने गर्भवती स्त्रियांनी खाणं टाळावं यामुळे गर्भाला त्रास होऊ शकतो.
- पोटाचे विकार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपई खाऊ नये.
