धाराशिव : कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आपण मिठाई खाऊन तोंड गोड करतो. गोडाच्या पदार्थांमध्ये खव्याचा प्रामुख्यानं वापर केला जातो. शिवाय बाजारात खव्याच्या मिठाईलाही विशेष मागणी असते. परंतु सध्या हाच खवा आणि पेढा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कारण खव्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरलेत. आता खव्याच्या ब्रॅण्डिंग आणि पॅकेजिंगसाठी सरकारनं विशेष योजना द्यावी, अशी मागणी खवा व्यावसायिकांनी केली आहे.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील भूम वाशी तालुक्यात खवा आणि खव्याचे पेढे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. इथं दररोज उत्पादित केल्या जाणाऱ्या 3 ते 4 लिटर दुधातून काही दुधाचा खवा बनवला जातो, तर काही दूध विक्रीसाठी बाजारात नेलं जातं. तसंच इथं केवळ खवाच नाही, तर पेढेसुद्धा बनतात. 1 किलो खव्यासाठी जवळपास 5 लिटर दुधाची आवश्यकता असते. अशा स्थितीत सध्या इथं खव्याला केवळ 190 ते 200 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे हे व्यावसायिकांना परवडणारं नाही.
हेही वाचा : बंपर दूध उत्पादनासाठी गायीच्या 'या' 5 प्रजाती सर्वोत्तम! रोज मिळू शकतं 40 लिटर दूध
विशेष म्हणजे 1 किलो खवा बनवण्यासाठी दुधासाठी खर्च करावे लागतात 150 रुपये, तर लाकूड किंवा लाईटसाठी प्रति किलो 30 रुपये पकडले तरी 1 किलो खव्यासाठी साधारण 180 रुपयांचा खर्च येतो. त्यात मिळणाऱ्या 190 ते 200 रुपये प्रति किलोच्या भावात वाहतुकीचा खर्चही भागवावा लागतो. त्यामुळे सध्या खवा व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. खव्याच्या बाजारभावात घसरण झाल्यानं महिन्याचा घरखर्च सांभाळणंही कठीण झालंय.
खवा व्यावसायिक विनोद जोगदंड यांनी सांगितलं की, या व्यवसायाला अनुदान द्यावं, किंबहुना खव्याची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी खवा व्यावसायिकांना ब्रॅण्डिंग तयार करण्यासाठी सरकारनं विशेष मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.