मुंबई : परिस्थिती माणसाला खंबीर बनवते, असं आपण ऐकून आहोत. मुंबईतील चेंबूर येथील अंकुश साळवीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. आज हा तरुण अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. नेमकं त्याने काय केलं, आज त्याची सर्वत्र चर्चा का होत आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
अंकुशने बारावीचे शिक्षण घेतल्यावर अनेक ठिकाणी वेटर म्हणून काम केले. घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. शाळेत असतानाही अंकुशने अनेक हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम केले. त्यासोबत अनेक दुकानांमध्ये छोटी छोटी कामे केली. अंकुशने दोन ते तीन वर्षे खूप मेहनत केली आणि पैसे जमा करून स्वतःचे हॉटेल प्रारंभ या नावाने सुरू केले.
advertisement
त्याची आई अनेकांच्या घरी धुणीभांडी करायची. तर वडील कॅन्टीनमध्ये कामाला होते. अंकुशला पुढे शिकायचे होते. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुढे शिकता आलं नाही. पण त्याने हार नाही मानली. आपले स्वतःचे हॉटेल असावे, म्हणजे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागणार नाही, असे त्याच्या आईचे आणि त्याचे स्वप्न होते. त्याचे वय सध्या फक्त 25 वर्षे आहे आणि आज तो या वयात हॉटेल चालवत आहे.
MPSC मध्ये तब्बल 16 वेळा अपयश, सुरू केला स्वतःचा व्यवसाय, आज वर्षाला 1 कोटी रुपयांची उलाढाल
अंकुशच्या हॉटेलमध्ये मिळतात हे पदार्थ -
अंकुशचे हॉटेल प्रारंभ हे चेंबूरमधील वैभव नगर येथे आहे. या हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारचे महाराष्ट्रीयन आणि चायनीज फूड मिळतं. या सगळ्यांची किंमतही अगदी कमी आहे. याठिकाणी चिकन 65 फक्त 120 रुपयांना मिळते. त्यासोबत चिकन चिली फक्त 110 रूपये, चिकन सिंगापूर राईस 110 रूपये, व्हेज फ्राईड राईस 80, व्हेज मंचाव सूप 60 रूपये, हक्का नूडल्स 90 रुपयांना मिळतात. त्यासोबत लहान मुलांच्या आवडीच्या फ्रँकी, चायनीज भेळ या गोष्टी तर फक्त 20 रुपयांना मिळतात. त्याच्या इथे मिळणारे हे सगळे पदार्थ अगदी उत्तम प्रतीचे आणि चविष्ट आहेत, अशी स्तुती ग्राहकही करतात.
आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यांना स्वस्त दरात चांगल्या गोष्टी मिळाव्यात हाच अंकुशचा उद्देश आहे. मराठी माणूस कधीच व्यवसायात रिस्क घेत नाही, असे म्हटले जाते. पण रिस्क घेतल्याशिवाय यश मिळत नाही, हा अनुभव अंकुशला आल्याने त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याचे हॉटेल प्रारंभ चेंबूरकरांचं आवडीचं हॉटेल झाले आह. कॉलेजच्या मुलांची चायनीज खाण्यासाठी तर इथे कायम गर्दी असते.
'मी लहानपणी खूप गरिबीचे दिवस पाहिले. पण कदाचित त्याचमुळे आज मी यश संपादन करू शकलो आहे. अनेक लोकांनी तुला हे जमणार नाही, असे टोमणे मारले. पण जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. माझ्या या संपूर्ण प्रवासात आई-वडील मित्र-मैत्रिणींचा खूप मोलाचा वाटा आहे,' अशी प्रतिक्रिया त्याने लोकल18 शी बोलताना दिली.
तुम्हालाही जर अंकुश साळवी या तरुणाच्या हॉटेलमध्ये चायनीज किंवा इतर महाराष्ट्रीयन फूड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही चेंबूर येथील हॉटेल प्रारंभला नक्की भेट देऊ शकतात आणि मस्त गरमागरम आणि चविष्ट चायनीज फूडचा आस्वाद घेऊ शकतात.