पुणे : पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमीच म्हणत असतो. कारण पुण्यात नेहमीच काही ना काही वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याची खाद्य संस्कृती तर जगात प्रसिद्ध आहे. आता याच पुण्यात एक खास पदार्थ मिळतोय. पाणीपुरीचे सगळेच चाहते असतात आणि सर्वांनी चपटीत पाणीपुरी खाल्ली देखील असेल. पण पुण्यात चक्क फायर पिझ्झापुरी मिळतेय. पुण्यातील शुक्रवार पेठेत ही फायर पिझ्झापुरी खायला मोठी गर्दी होतेय. याच फायर पिझ्झापुरीबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
पुण्यातील शुक्रवार पेठ इथे किरण मारणे हे गेल्या 17 वर्षांपासून मारणे भेळ या नावाने व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे सँडविच, भेळ आणि चॅटचे देखील वेगवेगळे प्रकार मिळतात. मारणे भेळ येथील फायर पिझ्झापुरी ही प्रसिद्ध असून खवय्ये त्यावर ताव मारत असतात. गेल्या काही वर्षांपासून ही खास डिश इथे मिळत असून ती खाण्यासाठी पुणेकरांची गर्दी असते.
पुण्यातील निसर्ग प्रेमी कुटुंब, शेकडो झाडं आणि फुलपाखरांची फुलवली बाग, Video
कशी बनते फायर पिझ्झापुरी?
किरण सांगतात की, “2008 साली भेळ आणि पाणीपुरीचा व्यवसाय सुरु केला होता. 2011 मध्ये फायर पिझ्झा पुरी ही संकल्पना आम्ही सुरु केली. पुण्यामध्ये ही डिश मिळणारं आणचं एकमेव ठिकाण आहे. स्वीट कॉर्न, कांदा, शिमला मिरची, पिझ्झा सॉस वापरून आणि त्यावर चॅट मसाला टाकून ही फायर पिझ्झापुरी बनवली जाते. ही डिश आम्ही स्वत: तयार केलीये. ही टेस्टी फायर पिझ्झापुरी सुरुवातीला 20 रुपयांना मिळत होती. आता ती फक्त 60 रुपयांना मिळते," असे किरण मारणे सांगतात.
या डिशलाही खवय्यांची पसंती
फायर पिझ्झापुरी सोबतच भेळ, पाणीपुरी, पनीर तंदूर ग्रील सँडविच प्रसिद्ध आहेत. यामध्ये मॅव्हनिजचा वापर केला जात नाही. तसेच मसाला पुरी, दहीपुरी, रगडा पुरी या 20 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत आहेत. इथं चॅटचे देखील 5 ते 6 वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे फायर पिझ्झापुरीसह इतर पदार्थ खाण्यासाठी खवय्ये आवर्जून इकडे येतात, असेही मारणे सांगतात.