या केंद्राची सुरुवात सुमारे 1931 साली झाली. त्या काळात पुणे शहर आपली खास ओळख तयार करत होते आणि त्याच वेळी मंचरकर कुटुंबातील आजीबाईंनी भेळीचा हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला एका रुपयाला मिळणारी भेळ त्या काळात मोठी मेजवानी मानली जायची. आज मात्र काळानुसार भाव वाढले असले तरी भेळीची चव आणि परंपरा मात्र तशीच टिकून आहे. सध्या या व्यवसायाची तिसरी पिढी हा वारसा पुढे नेत आहे.
advertisement
राजेश मंचरकर सांगतात, आमची भेळ ही फक्त चवीसाठी नव्हे तर तिच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. फरसाण, चटणी, मसाले हे सर्व घटक आम्ही स्वतः तयार करतो. यामुळे प्रत्येक भेळीत एक वेगळा ताजेपणा आणि सुगंध टिकून राहतो. येथे फरसाण भेळ, ओली भेळ, सुकी भेळ आणि मटकी भेळ असे चार ते पाच प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकारची भेळ तिच्या खास चवीमुळे जुन्या ग्राहकांमध्ये आजही लोकप्रिय आहे.
गेल्या नऊ दशकांत पुण्याचं रूप बऱ्याच अंशी बदललं, पण राजेश भेळ केंद्राची ओळख मात्र कायम राहिली. जुन्या ग्राहकांपासून ते नव्या पिढीपर्यंत सर्वांना येथे एक प्रकारचं आपलेपण वाटतं. या ठिकाणाचा सुवास, भेळीचा कुरकुरीतपणा आणि तिखट-गोड चवीचा संगम आजही प्रत्येकाला जुन्या पुण्याची आठवण करून देतो.
94 वर्षांचा हा प्रवास फक्त खाद्य व्यवसायाचा नाही, तर पुण्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि चवीचा वारसा जपणाऱ्या एक कहाणीचा आहे. राजेश भेळ केंद्र हे नाव आजही पुण्याच्या खाद्यनकाशावर अभिमानाने झळकत आहे आणि पुढच्या पिढ्यांनाही त्याच परंपरेचा सुवास देत आहे.





