कोथरूडमध्ये राहणाऱ्या अस्मिता थोरात आणि कृष्णा थोरात यांनी घरातच सुरू केलेल्या छोट्या मेसच्या व्यवसायाचं मोठ्या फूड सेंटरमध्ये रूपांतर झालं आहे. या फुड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना चविष्ट आणि अतिशय हायजेनिक जेवण दिले जाते. लोकल 18 शी सोबत बोलताना आकाश थोरात यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
सरकारी नोकरी करणारे कृष्णा थोरात आणि गृहिणी असणाऱ्या अस्मिता थोरात यांनी समाजसेवेचा दृष्टिकोन समोर ठेवून 2008 मध्ये घरातूनच छोट्या स्वरूपाचा मेस व्ययसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी 70 ते 80 डबे पुरवत होते. कोथरूड परिसरात असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कृष्णा थोरात यांनी जेवणाचे डब्बे पोहोचवण्याचे काम हाती घेतले होते. उत्तम चव, स्वच्छता आणि आपुलकीच्या बळावर थोरात दांपत्याच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
advertisement
मागणी वाढू लागल्याने त्यांनी राहत्या घराचं फूड सेंटरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये थोरात दांम्पत्याने 'वैष्णवी फुड सेंटर'ची स्थापना केली. आता याठिकाणी जेवणासाठी नागरिकांची सतत गर्दी असते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक नागरिक येथील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. कमी दरात चविष्ट जेवण मिळत असल्याने अनेक विद्यार्थी त्यांचे नियमित ग्राहक बनले आहेत.
कमी दरात जेवण
घरगुती चव, स्वच्छता, आणि मनापासून सेवा या गोष्टींवर या फूड सेंटरमध्ये भर दिला जातो. या ठिकाणी अत्यंत कमी दरात चविष्ट जेवण मिळतं. यांच्या जेवणामध्ये पोळीभाजी, उपवासाचे पदार्थ, गोड पदार्थांचा समावेश आहे.





