ताणतणाव, थकवा आणि शरीरदुखी यासारख्या समस्यांचं प्रमाण वाढतंय. प्रत्येक छोट्याशा समस्येसाठी वेदनाशामक औषध घेण्याची घाई करतात. पण यामुळे अनेकदा काही वेळापुरता आराम मिळतो. या सगळ्यावर मिठाच्या पाण्यानं आंघोळ करणं हा एक प्रभावी उपाय आहे. समुद्री मीठानं आंघोळ केल्यानं मिळणारे फायदे समजावून घेऊ.
Mental Health : खाण्याच्या सवयींमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं ? वाचा सविस्तर
advertisement
समुद्राचे पाणी सुकवून समुद्री मीठ तयार केलं जातं. त्यात नियमित टेबल मीठापेक्षा मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जस्त यासारखी खनिजं जास्त असतात. ही खनिजं आपल्या त्वचेसाठी, स्नायूंसाठी आणि सांध्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.
त्वचेसाठी फायदेशीर - समुद्री मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेसाठी अनेक फायदे मिळतात. मीठामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी तयार करण्यास प्रोत्साहन मिळतं. याव्यतिरिक्त, त्वचा हायड्रेटेड राहण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
स्नायूंच्या वेदना कमी होतात - दिवसभर काम केल्यानं, विशेषतः बसून काम करताना, आठ ते नऊ तास एकाच वेळी काम केल्यानं शरीर कडक होणं आणि स्नायू दुखणं वाढू शकतं. अशा परिस्थितीत, वेदनाशामक औषधांऐवजी मिठाच्या पाण्यानं आंघोळ करणं हे वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यामुळे रक्ताभिसरण वाढतं, स्नायूंचा त्रास कमी होतो आणि विशेषतः थकलेल्या पायांसाठी मीठ आरामदायी आहे.
ताण कमी करण्यासाठी उपयुक्त - समुद्री मीठाचं पाणी केवळ शरीरासाठीच नाही तर मनाच्या आरोग्यासाठी देखील चांगलं आहे. कोमट मीठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानं ताण कमी होतो आणि झोप सुधारते. झोपण्यापूर्वी मीठाच्या पाण्यानं आंघोळ करणं विशेष फायदेशीर आहे.
यासाठी, एका टबमधे कोमट पाणी भरा. त्यात पाव कप ते दोन कप समुद्री मीठ घाला. पाण्यात मीठ विरघळल्यानंतर, 15-20 मिनिटं पाण्यात आरामात बसा. नंतर, साध्या कोमट पाण्यानं शरीर स्वच्छ धुवा आणि आंघोळीनंतर भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावा. या पद्धतीमुळे लवकर आराम मिळतो. पण, जर तुमच्या त्वचेवर उघड्या जखमा किंवा संसर्ग असतील किंवा तुम्हाला मिठाची अॅलर्जी असेल तर मीठानं आंघोळ करणं टाळा.