ऋषिकेश : दही हा भारतीय अन्नपदार्थांमधील महत्त्वाचा भाग आहे. दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. दह्यातील प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिनं आपली हाडं भक्कम करतात, पचनक्रिया सुधारतात, तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. काहीजण मीठ घालून दही खातात, तर काहीजणांना साखर घातलेलं दही आवडतं. परंतु आरोग्यासाठी नेमकं काय उत्तम असतं, मीठ घातलेलं दही की साखर घातलेलं दही? जाणून घेऊया.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर राजकुमार सांगतात की, मीठ घातल्यास दह्यातील प्रोबायोटिक्सचा फायदा कमी होऊ शकतो. तर, साखर घातलेलं दही खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. आयुर्वेदानुसार, थोड्या प्रमाणात मीठ घातलेलं दही खाल्ल्यास पचन सुधारतं. परंतु जास्त साखरेमुळे मात्र शरीरातील कफ वाढू शकतो. त्यामुळे कधीही दही जसं आहे तसं म्हणजे नैसर्गिक खाणं उत्तम मानलं जातं. परंतु जर काही घालूनच खायचं असेल तर त्यात सैंधव मीठ, गूळ, मध किंवा फळं घालावी.
आयुर्वेदानुसार, मीठ घालून दही खाल्ल्यास भूक वाढते, पचनक्रिया सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात. परंतु हे मीठ कमीच असायला हवं. तसंच उन्हाळ्यात सैंधव मीठ घातलेलं दही खाल्ल्यानं शरीर थंड राहतं, शरीरातील पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित राहतं. तर, दह्यात साखर घालून खाल्ल्यास ते लवकर पचतं, परंतु रक्तातील साखरही जलद वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी अजिबात साखर घालून दही खाऊ नये. त्यामुळे वजन वाढू शकतं, तसंच इतरही समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात आपण गूळ किंवा मध घालून दही खाऊ शकता. परंतु जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानं कफ होऊ शकतो, तसंच याचा पचनक्रियेवरही वाईट परिणाम होतो.
डॉक्टर म्हणाले की, आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर दही नैसर्गित स्वरूपातच खावं. चवीसाठी मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ वापरावं. जर गोड आवडत असेल तर साखरेऐवजी मध, गूळ किंवा ताजी फळं घालून दही खावं. यामुळे दह्यातील सर्व पौष्टिक तत्त्व मिळतात आणि आरोग्य उत्तम राहतं.