नफ्याच्या लालसेपोटी दूध उत्पादक आणि विक्रेते दुधात पाणी, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा किंवा वनस्पती तेल यांसारख्या आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या पदार्थांची भेसळ करत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. हे भेसळयुक्त दूध लहान मुलांसह सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या गंभीर प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी तातडीने संबंधित दूध विक्रेत्याकडून दुधाचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, सणासुदीच्या काळात अशा भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
advertisement
भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय
चव आणि वास: शुद्ध दुधाची चव किंचित गोड असते. भेसळयुक्त दुधाला साबणासारखा किंवा कडवट वास येऊ शकतो.
चिकटपणा आणि जाडी: भेसळयुक्त दूध उकळल्यावर ते जास्त चिकट किंवा रबरासारखे जाड होऊ शकते.
पाण्याची भेसळ: दुधाचा एक थेंब पॉलिश केलेल्या तिरकस पृष्ठभागावर सोडा. शुद्ध दूध हळूवारपणे खाली सरकते आणि मागे पांढरी रेषा सोडते, तर भेसळयुक्त पातळ दूध लगेच वाहून जाते.
फेस: 10 मिली दूध एका बाटलीत घेऊन तेवढेच पाणी मिसळा आणि जोरजोरात हलवा. जर दुधात डिटर्जंट असेल, तर खूप जास्त आणि लवकर फेस तयार होतो आणि तो बराच वेळ टिकून राहतो.
स्टार्च/पिठाची भेसळ: 5 मिली दुधात 2-3 थेंब आयोडीन टिंचरचे टाका. जर दुधाचा रंग निळसर झाला, तर त्यात स्टार्च किंवा पिठाची भेसळ आहे.
युरियाची भेसळ: थोडंसं दूध एका वाटीत घ्या आणि त्यात तुरडाळीची किंवा सोयाबीनची पावडर आणि लाल लिटमस पेपर टाका. लाल लिटमस पेपरचा रंग निळा झाल्यास, दुधात युरियाची भेसळ असण्याची शक्यता असते.
