योनीची स्वच्छता ठेवण्याचे 6 महत्त्वाचे नियम:
फक्त कोमट पाण्याचा वापर
योनी स्वतःहून स्वतःची स्वच्छता करते. योनीच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या 'लॅक्टोबॅसिली' नावाचे चांगले जीवाणू असतात, जे पीएच पातळी संतुलित ठेवतात. ही पातळी बिघडू नये म्हणून योनी धुण्यासाठी फक्त कोमट पाण्याचा वापर करावा.
साबण, परफ्यूमयुक्त उत्पादने टाळा
योनीचा पीएच स्तर (pH 3.8-4.5) खूप संवेदनशील असतो. साबण, परफ्यूमयुक्त वॉश, आणि डच केल्याने हा पीएच स्तर बिघडतो, ज्यामुळे चांगले जीवाणू मरतात आणि हानिकारक जीवाणूंची वाढ होते. यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
advertisement
पुसण्याची योग्य पद्धत
योनीचा भाग समोरून मागच्या बाजूला (फ्रंट टू बॅक) पुसावा. यामुळे गुदद्वारातील जीवाणू योनीमध्ये प्रवेश करत नाहीत आणि मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) टाळता येतो.
मासिक पाळीतील स्वच्छता
मासिक पाळीच्या काळात दर 4-6 तासांनी सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन बदलावे. जास्त वेळ पॅडचा वापर केल्यास जीवाणूंची वाढ होते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
श्वास घेण्यायोग्य कपड्यांचा वापर
सुती आणि सैल कपड्यांचा वापर करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. सिंथेटिक कपड्यांमुळे घामामुळे योनीच्या भागात ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे जीवाणू आणि बुरशीची वाढ होते.
लहानपणापासूनच स्वच्छता शिकवा
मुलींना लहानपणापासूनच मासिक पाळी आणि शरीराच्या स्वच्छतेबद्दल योग्य माहिती देणे आवश्यक आहे. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच, वयाच्या 10 ते 12 वर्षांपासून मुलींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे आहे.
योनीची स्वच्छता करणे म्हणजे तिला साबणाने घासून स्वच्छ करणे नव्हे, तर नैसर्गिक संतुलन राखणे. या सोप्या टिप्स फॉलो केल्यास महिलांना संसर्ग आणि इतर समस्यांपासून वाचण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)