योगासनं स्त्रियांसाठी तसंच पुरुषांसाठीही फायदेशीर असतात. पौरुषत्व वाढवण्यासाठी योगासनांचा फायदा होऊ शकतो. जे पुरुष वडील होण्यास सक्षम नसतात, त्यांना योगासनं केल्यास खूप फायदा होऊ शकतो, असं एम्सच्या गायनॅकॉलॉजी आणि अॅनॉटॉमी विभागातील तज्ज्ञांनी सांगितलंय. मानसिक आरोग्याशी निगडीत आजारांवरही योगासनं प्रभावी ठरतात, असं काही डॉक्टरांना वाटतं. एम्सनं नुकत्याच दिलेल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, की योगासनं केल्यामुळे पुरुषांच्या स्पर्ममधील डीएनएची गुणवत्ता सुधारते. त्यासाठी काही ठराविक योगासनं फायदेशीर ठरतात. त्यात सूर्यनमस्कार, त्रिकोणासन आणि पेल्व्हिक फ्लोर यांचा समावेश होतो. ताण हलका करण्यासाठीही या आसनाची मदत होते.
advertisement
व्यायाम कसे करावेत?
योगासनं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच ही आसनं ठराविक वेळी केल्यानं त्याचा फायदा होतो. सूर्यनमस्कार दिवसभरात कधीही घालता येतात. मात्र सूर्योदयानंतर लगेचच सकाळच्या वेळी सूर्यनमस्कार घालणं जास्त फायदेशीर असतं. कारण कोवळ्या सूर्यप्रकाशात गेल्यावर आपल्या भोवतालचं सौरजालसक्रिय होतं. सूर्यनमस्कार घालण्यासाठी सूर्याच्या दिशेला तोंड करून सरळ उभं राहा आणि श्वास घेऊन डावा पाय मागे न्या. उजवा पाय वाकवून पुढे ठेवा. डोकं मागच्या बाजूला न्या आणि दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवून नजर आकाशाकडे ठेवा. पाचव्या आकड्यावेळी श्वास सोडत उजवा पाय मागे घेऊन जा. त्यानंतर दुसरा पाय मागे घ्या. चतुरंगदडासनानंतर दोन्ही हात, चौडे, छाती, गुडघे जमिनीला टेकवा. नंतर पुढच्या बाजूने वर या आणि पहिल्या कृतीच्या विरुद्ध कृती करत हात जोडून उभे रहा.
त्रिकोणासनाकरता सरळ उभे राहून शरीर डाव्या बाजूला वाकवा. डाव्या हाताला डाव्या पायाच्या दिशेनं खाली न्या आणि बोटं गुडघ्याच्या खाली जाऊ द्या. गुडघे आणि कोपर सरळ ठेवून या आसनात राहा. याच पद्धतीनं उजव्या बाजूलाही करा.
पेल्व्हिक फ्लोर म्हणजेच ओटीपोटाचे स्नायू मूत्राशय, आतडी आणि गर्भाशयाशी जोडलेले असतात. ओटीपोटाची आसनं करण्यासाठी जमिनीवर झोपा, दीर्घ श्वास घ्या आणि पाय ताणून छातीजवळ आणा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने या व्यायामाची पातळी ठरवा.
योगासनांमुळे पुरुषांची शारीरिक ताकद वाढतेच, शिवाय स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. त्याचाही फायदा स्पर्ममधील डीएनएची गुणवत्ता वाढण्यास होतो.