टाइप 1.5 डायबिटीस म्हणजे नेमकं काय ?
नावावरून असं वाटू शकतं की टाइप 1.5 डायबिटीस हा टाइप 1 आणि टाइप 2 यांच्या मधली स्थिती किंवा प्रकार असू शकतो. मात्र टाइप 1.5 डायबिटीस हा दोघांच्या मधली स्थिती नसून तर दोघांचं एकत्रित रूप आहे. वैद्यकीय भाषेत त्याला लेटेंट ऑटोइम्यून डायबेटिस इन ॲडल्ट्स (LADA) म्हणतात. आपल्याला माहिती आहे की, टाइप 1 प्रकारामध्ये पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन अजिबात स्रवत नाही. तर टाइप 2 मध्ये इन्सुलिन स्रवण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. या प्रकारातल्या डायबिटीसमध्ये रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या स्वादुपिंडाचं नुकसान करू लागते, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन कमी होतं. नंतर या प्रकाराचं रूपांतर हळूहळू टाईप 2 डायबिटीसमध्ये विकसित होऊ लागतं.
advertisement
टाइप 1.5 डायबिटीस घातक का ?
टाइप 1 डायबिटीस लहानपणीच ओळखता येतो. टाइप 2 डायबिटीस काही लक्षणं दिसल्यानंतर किंवा रक्त तपासणी केल्यानंतर समजून येतो. मात्र टाइप 1 आणि 2 प्रमाणे टाइप 1.5 डाटबिटीसची लक्षणं दिसून येत नाहीत आणि आली तरी टाईप 2 सारखी असल्यामुळे डायबिटीसचा नेमका प्रकार कोणता आहे ? ते समजून येत नाही. त्यामुळे या रोगाला वेळीच ओळखून, त्याला रोखून त्यावर उपचार करणं कठीण आहे. त्यामुळे टाइप 1.5 डायबिटीस हळूहळू फोफावत जातो आणि आतून शरीर पोखरायला सुरूवात करतो.
टाइप 1.5 डायबिटीसचं कारण
डॉ.बन्सल म्हणतात की, टाइप 1.5 मधुमेह हा स्वयंप्रतिकार रोग आहे. ज्यामध्ये आपल्याच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच शरीरातल्या बीटा पेशींवर हल्ला करते. ज्याचा थेट परिणाम पॅन्क्रियाजवर होतो. ज्यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो. अशा प्रकारच्या डायबिटीसला अनुवांशिकता किंवा वाढतं प्रदूषणही जबाबदार ठरू शकतं.
टाइप 1.5 डायबिटीसची लक्षणे कोणती?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टाइप 1.5 मधुमेहाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात टाइप 2 मधुमेहासारखी असतात.
- जास्त तहान लागणे
- वारंवार लघवी होणे
- थकवा येणे
- अंधुक दिसणे
- अचानक वजन कमी होणं
हा रोग जसजसा वाढत जातो तसतसं इंसुलिनचे उत्पादन कमी झाल्यामुळे शरीरात धोकादायक ॲसिडची निर्मिती सुरू होते. यावर वेळेवर उपचार न केल्यास हृदयविकार, किडनी समस्या आणि दृष्टी जाण्याची भीती असते.
टाइप 1.5 डायबिटीसवर उपचार :
डॉक्टरांच्या मते, टाइप टाइप 1.5 डायबिटीस उपचार हा टाइप 1 आणि टाइप 2 या दोन्हींचं मिश्रण आहे. उपचारांसाठी औषध, इन्सुलिन डोस आणि जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत. टाइप 1 डायबिटीस असलेल्या रुग्णांप्रमाणे या आजाराच्या रुग्णांना इन्सुलिनची आवश्यकता असू शकते. जर रक्तातील साखरेची पातळी सुरुवातीला नियंत्रित झाली तर गोळ्याऔषंधानी देखील टाइप 1.5 डायबिटीस वर उपचार केले जाऊ शकतात. याशिवाय या प्रकारच्या डायबिटीसलाही आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम फायद्याचे ठरू शकतात.