मटण हे लाल मांस असले तरी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास ते शरीरासाठी उपयुक्त ठरते. चिकन आणि मासे यांच्याइतकेच मटणालाही आहारात महत्त्व आहे. विशेषतः हिवाळ्यात मटणाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. कारण ते शरीराला उष्णता देतात आणि ताकद वाढवतात.
मटणाचे लिव्हर (कलेजी) हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर भाग मानला जातो. बोकडाच्या लिव्हरमध्ये लोह (आयर्न) आणि व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि हिमोग्लोबिन कमी असलेल्या लोकांसाठी लिव्हर उपयुक्त ठरते. आठवड्यातून एकदा लिव्हर खाल्ल्यास शरीरात रक्तनिर्मितीस मदत होते.
advertisement
मटणाची हाडे आणि पायाचे सूप (पाया सूप) हे विशेषतः सर्दी, खोकला आणि कमजोरीसाठी गुणकारी मानले जाते. पायाच्या सूपमध्ये कॅल्शियम, कोलेजन आणि खनिजे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच हे सूप हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.
बोकडाचे मांस तुलनेने कमी चरबीचे असते. हे प्रथिने आणि लोहाने समृद्ध असल्यामुळे स्नायू मजबूत करण्यास मदत करते. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर जास्त चरबीयुक्त मांसाऐवजी लीन मटण हा चांगला पर्याय ठरतो.
मटण बोटी (आतडी) या भागातही अनेक उपयुक्त पोषक घटक आढळतात. यामध्ये जीवनसत्त्वे A, B12, D, E आणि K भरपूर प्रमाणात असतात. मटण बोटी आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
मटण कितीही पौष्टिक असले तरी ते मर्यादित प्रमाणातच खाणे महत्त्वाचे आहे. मटण तळण्यापेक्षा उकडून, रस्सा किंवा सूप स्वरूपात शिजवले तर त्याचे पोषणमूल्य टिकून राहते आणि चरबीचे प्रमाणही कमी राहते. संतुलित आहारात योग्य प्रमाणात मटणाचा समावेश केल्यास ते चवदार तर असतेच, पण आरोग्यासाठीही नक्कीच फायदेशीर ठरते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
