गणरायाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. माघी गणेश जयंतीनिमित्त घरोघरी उकडीचे मोदक बनवले जातील. तुम्हालासुद्धा अत्यंत सुरेख असे कळीदार आणि तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतील एवढे स्वादिष्ट मोदक बनवायचे असतील तर त्याची रेसिपी नोट करून ठेवा.
उकडीच्या मोदकांसाठी लागणारे साहित्य :
1 वाटी तांदळाचं पीठ
1 वाटी पाणी
1 वाटी ओल्या नारळाचा किस
advertisement
1 वाटी गूळ
चवीनुसार वेलचीपूड
केशर
तूप
थोडी खसखस
चवीनुसार मीठ
गुलकंद
खायचा रंग
उकडीच्या मोदकांची कृती :
सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची. कढई तापल्यावर त्यात वाटीभर पाणी घ्यायचं. त्यात चिमूटभर मीठ आणि चमचाभर तूप घालून एक उकळी येऊद्या. उकळी आल्यानंतर थोडं थोडं करून या पाण्यात तांदळाचं पीठ घालायचं. ते छान एकजीव होऊद्या. मग 5 मिनिटं त्यावर झाकण ठेवून वाफ येऊद्या. आता हे मिश्रण एका ताटात काढून व्यवस्थित मऊ होईपर्यंत मळून घ्या.
आता सारणासाठी कढईत ओल्या नारळाचा किस, थोडी खसखस आणि गूळ घालून पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात थोडं तूप आणि वरून वेलचीपूड घाला. गूळ विरघळेपर्यंत मिश्रण ढवळत राहा.
गुलकंद मोदक बनवण्यासाठी आपण जो वाटीभर गूळ घेतलाय त्यातले 2 चमचे कमी करून त्यात 2 चमचे गुलकंद घालू शकता. साध्या मोदकांच्या सारणासाठी केलेली कृती इथंसुद्धा सारखीच करायची आहे.
आता मळलेल्या उकडीचे लहान लहान गोळे बनवून घ्या. सर्व गोळ्यांची समान अशी पारी करून त्यांना नाजूकशा कळ्या पाडा. त्यात तयार सारण भरून घ्या. आता मोदक तयार आहेत. हे मोदक गॅसवर वाफवण्यासाठी ठेवा. त्यांना वरून थोडं तूप आणि आवडीनुसार केशर लावा. 10 ते 15 मिनिटं चांगली वाफ येऊद्या. त्यानंतर आपले उकडीचे स्वादिष्ट असे मोदक तयार असतील. ते एका ताटात काढून वरून साजूक तूप सोडा. हे मोदक खाऊन खवय्ये अगदी तृप्त होतील.