छत्रपती संभाजीनगर : मुंबईत दररोज लाखो लोक लोकल प्रवास करतात. विविध शहरांमधून दररोज चाकरमानी रेल्वेनं मुंबईत येतात. इतकंच नाही तर आता राज्याच्या विविध भागांमध्ये लोक दररोज कामानिमित्त रेल्वे प्रवास करतात.
मराठवाड्यात रेल्वेचं मोठं जाळं आहे. इथून गाड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये जातात. हजारो लोकांचा दररोज प्रवास होतो, अशात आता 4 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडालीये.
advertisement
हेही वाचा : बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी वेस्टर्न रेल्वेकडून स्पेशल गाड्या, आरक्षण कधीपासून?
तांत्रिक कारणामुळे 2 ते 5 ऑगस्टदरम्यान नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या 4 रेल्वे गाड्या अचानक रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचं नियोजन विस्कळीत झालंय. नांदेड-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-तिरुपती या दोन्ही गाड्या 2 ऑगस्ट रोजी धावणार नाहीत, तर तिरुपती-छत्रपती संभाजीनगर गाडी 3 ऑगस्ट आणि छत्रपती संभाजीनगर-नांदेड गाडी 5 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.
नांदेड ते मनमाड डेमू अंशतः रद्द
रुळाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी नांदेड ते मनमाड डेमू 31 ऑगस्टपर्यंत नांदेड ते पूर्णादरम्यान अंशतः रद्द केली आहे. या कालावधीत ही रेल्वे पूर्णा इथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल. तर, मनमाड ते नांदेड डेमू याच कालावधीत पूर्णा ते नांदेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. याची नोंद घेऊन प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय.