धकाधकीच्या जीवशैलीत ही अशी ॲसिडिटीची समस्या असणारी क्रांती एकटी नाही, असे खूप लोक आहेत. क्रांतीसारखा हा अनुभव तुम्हालाही येत असेल, ॲसिडिटीचा त्रास होत असेल. ॲसिडिटी किंवा हार्टबर्न म्हणजे छातीत, घशात जळजळ होणं. पोटातील अॅसिड किंवा आम्ल वर येण्यामुळे होऊ शकतं. यूके नेशनल हेल्थच्या माहितीनुसार हार्टबर्न आणि अॅसिड रिफ्लक्समध्ये असा त्रास वारंवार जाणवू शकतो आणि काही लोकांमध्ये हा त्रास सतत असेल तर त्याला GERD म्हणतात.
advertisement
Fridge Blast : बॉम्बसारखा फुटला फ्रिज, मुंबईत तिघांचा मृत्यू; फ्रिजचा स्फोट कसा होतो?
ॲसिडिटीमध्ये नाश्ता महत्त्वाचा
ॲसिडिटीमध्ये नाश्ता करणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी पोट रिकामं असतं. वरून आपण जर रिकाम्या पोटी चहा, कॉफी किंवा तळलेलं, खूप तिखट घेतलं तर जळजळ वाढू शकते. त्यामुळे ॲसिडिटीमध्ये नाश्ता करताना 3 नियम पाळायलाच हवेत. एक म्हणजे कमी तेल आणि कमी मसाला, दुसरं म्हणजे थोडंथोडं खा, एकाचवेळी डास्त नको, तिसरं म्हणजे खाऊन लगेच झोपू नका, आडवं पडू नका, थोडं चालणं चांगलं.
ॲसिडिटीमध्ये काय नाश्ता करायचा?
अमेरिक कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये कॉफी, चॉकलेट, पेपरमिंट, तेलकट किंवा तिखट पदार्थ, टोमॅटोचे पदार्थ आणि दारू यांचा उल्लेख अॅसिडीटी वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये केला आहे. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत. नाश्ता हलका, कमी तेल-मसाल्याचा आणि लवकर पचणारा असावा. ओट्स, दलिया, मूगडाळ खिचडी, इडली, साधा उपमा, पोळी-दही किंवा ताक असे पदार्थ पोटाची जळजळ, आंबट ढेकर आणि जडपणा कमी करायला मदत करू शकतात. पण हे पदार्थ खाण्याचीसुद्धा एक पद्धत आहे, त्याबाबत पाहुयात.
ॲसिडिटीमध्ये ओट्स किंवा दलिया
ओट्स किंव दलिया हलका, फायबरयुक्त आणि पोटासाठी योग्य असतो. जॉन हॉपकिन्स मेडिसीनच्या अॅसिडीटीसंबंधी डाएट सल्ल्यात ओटमीलसारखी धान्य आणि हाय फायबर फूडबद्दल सांगितलं आहे, कारण ते पचनात मदत करून रिफ्लक्सचा धोका कमी करण्यास हातभार लावू शकतात.
Tilgul Ladoo : कुकरच्या एका शिट्टीत बनवा मऊसूत तिळगूळ लाडू आणि तिळाची वडी
आता ओट्स कसं घ्यायचं तर पाण्यात किंवा पातळ दुधात शिजवा. वरून केळी किंवा सफरचंद टाका. साखर टाका पण कमी. चॉकलेट/कोको वापरणं टाळा.
भाज्यांचे पोहे
पोहे हलके आणि पटकन पचणारे आहेत. पण ते तेलकट तिखट नसावेत. तेल 1 टीस्पूनपेक्षा कमी, कमी तिखट. त्यात गाजर, मटार, बीन्स घाला. थोडा टोमॅटो अॅड करा किंवा लिंबू पिळा. पण यामुळे तुमची जळजळ वाढत असेल तर मात्र हे टाळा.
मूगडाळ खिचडी
ॲसिडिटी वाढली की खिचडी म्हणजे पोटासाठी आरामदायी असा आहार. मऊ, हलकी आणि कमी मसाल्याची असल्यामुळे अनेकांना ती पचते. पण ती बनवताना फोडणी हलकी असावी, तूप कमी घालावं.
इडली
इडली सॉफ्ट आणि लाइट असल्याने ॲसिडिटीमध्ये बऱ्याच लोकांना चालते. 2-3 इडली तुम्ही खाऊ शकता पण त्याच्यासोबत असणारी खोबऱ्याची चटणी कमी तिखट असावी. सांबार शक्यतो टाळा कारण सांबरमध्ये टोमॅटो जास्त असेल तर जळजळ वाढते. ACG मध्ये टोमॅटोचे पदार्थ ट्रिगर फूड्स म्हणजे ॲसिडिटी वाढणारे असल्याचं सांगण्यात आलं आहे.
साधा उपमा किंवा पोळी आणि दही किंवा ताक
नाश्ता साधा आणि लो फॅट ठेवला तर पोटावर ताण येत नाही. कमी तेल आणि कमी तिखटाचा उपमा किंवा 1-2 पोळा आणि सोबत साधं दही किंवा ताक त्यात थोडं भाजलेलं जिरं, असा नाश्ता करा.
GERD किंवा Heartburn मध्ये डाएट सगळ्यांसाठी सारखा नसतो. मेयो क्लिनिक न्यूज नेटवर्कमध्येही सांगितलं आहे की सगळ्या लोकांसाठी सर्व पदार्थ बंद करणं आवश्यक नाही. प्रत्येकाचा ट्रिगर वेगळा असतो. म्हणजे वर सांगितलेल्या पदार्थांपैकी सगळेच पदार्थ अॅसिडीटीमध्ये सगळ्यांनाच चालतील असं नाही, काहींना त्यापैकी काही पदार्थांमध्ये त्रासही होऊ शकतो. तुम्हाला कोणता पदार्थ त्रास देतो, तो ओळखणं महत्वाचं.
