स्वच्छ व शुभ्र दात सौंदर्य वाढवतात. दातांचं आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे दररोज दोन वेळा दात घासण्याचा सल्ला डॉक्टर देतात. केवळ चांगलं दिसण्यासाठीच नाही, तर दात स्वच्छ केल्यानं तोंडाचं आरोग्यही चांगलं राहतं व इतर आजारांचा धोका कमी होतो, मात्र दात स्वच्छ घासूनही ते शुभ्र दिसत नाहीत, अशी अनेकांची तक्रार असते. वारंवार दात पिवळे पडतात. यामुळे चारचौघांत वावरण्यावर बंधनं येतात. दात पिवळे पडणं हे एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकतं. दात पिवळे पडण्यामागे काय कारणं असतात व त्यावर काय उपाय करता येतील, हे डॉक्टरांकडूनच जाणून घ्या.
advertisement
नवी दिल्लीतील पीतमपुरामधील गुलाटी डेंटल क्लिनिकमधील डेंटिस्ट वैभव गुलाटी यांच्या मते, दात पिवळे पडण्याची अनेक कारणं असू असतात. योग्य पद्धतीनं दात न घासल्याने दात पिवळे पडतात. पान, तंबाखू, गुटखा खाल्ल्यामुळे दातांचा रंग पिवळा पडू शकतो. एनर्जी ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, ग्रीन टी आणि जंक फूड जास्त खाल्ल्यानंही दात पिवळे पडू शकतात. अनेक अन्नपदार्थांमुळे दात पिवळे होण्याची समस्या उद्भवू शकते. बरेचदा दात पिवळे पडणं हे एखाद्या आजाराचचंच लक्षण नसतं, मात्र पायोरिया किंवा दातांच्या इतर अनेक आजारांचंही ते लक्षण असू शकतं. त्यामुळे दातांची तपासणी केल्यावरच दात पिवळे पडण्याचं नेमकं कारण समजू शकतं.
डॉक्टरांच्या मते, काही ठिकाणी पाण्यात फ्लोराइडचं प्रमाण जास्त असतं. यामुळे फ्लोरोसिसचा आजार होऊ शकतो. यात दातांवर पांढरे किंवा पिवळे डाग पडू शकतात. वाढत्या वयोमानानुसारही दात पिवळे पडू शकतात, मात्र दात नीट घासले तर दीर्घकाळासाठी ते स्वच्छ आणि चमकदार ठेवता येतात. दात नीट घासूनही ते पिवळे पडत असतील, तर दातांच्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज असते. दात खूप जास्त पिवळे झाले असतील, तर डॉक्टरांकडे जाऊन क्लिनिंग (स्केलिंग) करता येऊ शकतं.
यामुळे दात स्वच्छही होतील व पांढरेही दिसतील. डॉक्टरांच्या मते, पिवळे दात पांढरे करण्यासाठीचे घरगुती उपाय शास्त्रीयदृष्ट्या योग्य असतातच असं नाही. त्यामुळे असे उपाय करणं टाळलं पाहिजे. दात सातत्यानं पिवळे पडत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे तोंडाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते.
