लुईस ब्रेल जन्मतः अंध नव्हते. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या दुकानात खेळत असताना एका तीक्ष्ण वस्तूने त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. योग्य उपचार न मिळाल्यामुळे ही जखम वाढत गेली आणि काही वर्षांतच दोन्ही डोळे निकामी झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांना कायमचे अंधत्व आले. मात्र या संकटाने त्यांची जिद्द कमी झाली नाही. उलट शिक्षणाकडे त्यांचा ओढा अधिक वाढला.
advertisement
कुटुंबीयांनी त्यांची आवड ओळखून फ्रान्समधील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेत त्यांना प्रवेश मिळवून दिला. अभ्यास करत असताना अंध व्यक्तींना वाचनात येणाऱ्या अडचणी लुईस ब्रेल यांना प्रकर्षाने जाणवत होत्या. त्याच काळात रॉयल आर्मीचे निवृत्त कॅप्टन चार्ल्स बार्बर यांनी तयार केलेल्या चाचपडून वाचता येणाऱ्या लिपीबद्दल त्यांना माहिती मिळाली. मात्र ती लिपी वापरण्यास कठीण असल्याने सर्वसामान्य अंध व्यक्तींसाठी उपयुक्त ठरत नव्हती.
याच लिपीवर आधारित बदल करत लुईस ब्रेल यांनी फक्त सहा ठिपक्यांवर आधारित सोपी आणि परिणामकारक लिपी तयार केली. पुढे हीच लिपी त्यांच्या नावावरून ‘ब्रेल लिपी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आज ही लिपी जगभरातील अंध व्यक्तींसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे साधन ठरली आहे.
अंध बांधव जुई देशमुख हिने ब्रेल लिपीबाबत माहिती देताना सांगितले की, डोळस अक्षरे आणि ब्रेल लिपी यामध्ये मूलभूत फरक आहे. आपण सामान्यतः डावीकडून उजवीकडे लिहितो, मात्र ब्रेल लिपीत लेखन उजवीकडून डावीकडे केले जाते. नंतर तेच पान उलटवून डावीकडून उजवीकडे चाचपडत वाचले जाते. हा ब्रेल लिपीचा महत्त्वाचा भाग असल्याचे तिने स्पष्ट केले.
ब्रेल लिपी कोणत्याही एका भाषेसाठी वेगळी नसून संपूर्ण जगात तिचा फॉरमॅट एकसारखाच असल्याचेही जुईने सांगितले. ही लिपी फक्त सहा ठिपक्यांवर आधारित आहे. त्यामुळे मराठीतील ‘अ’, इंग्रजीतील ‘A’ किंवा इतर कोणत्याही भाषेतील तेच अक्षर ब्रेल लिपीत एकाच पद्धतीने लिहिले जाते.
आपल्या अनुभवाविषयी बोलताना जुई देशमुख म्हणाली की, ब्रेल लिपीमुळे तिचे शिक्षण सोपे झाले आहे. सध्या ती पदव्युत्तर शिक्षण घेत असून प्रशासकीय परीक्षांची तयारीही करत आहे. अभ्यास, वाचन आणि सराव या सर्व टप्प्यांमध्ये ब्रेल लिपी तिच्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे तिने सांगितले.
जागतिक ब्रेल दिनानिमित्त लुईस ब्रेल यांच्या कार्याचा वारसा आठवताना, ब्रेल लिपीने अंध व्यक्तींना दिलेला शिक्षणाचा प्रकाश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते.





