योगासनांचं महत्त्व आज भारतामुळे साऱ्या जगाला समजलं आहे. दर वर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. योगदिनासाठी याच दिवसाची निवड का करण्यात आली, ते माहीत आहे का? आंतरराष्ट्रीय योगदिन दुसऱ्या एखाद्या महिन्यात का साजरा केला जात नाही.
भारतीय संस्कृतीत आहारविहाराचे नियम सांगितलेले आहेत. आपल्या देशात योगसाधनेलाही फार प्राचीन परंपरा आहे. योगासनांमुळे केवळ शरीराचं नाही, तर मनाचंही स्वास्थ्य सुधारतं. त्याचं महत्त्व भारतामुळे सगळ्या जगाला समजलं. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सगळ्यात पहिल्यांदा मांडला होता. त्या वर्षी 11 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं त्या प्रस्तावाला मान्यता दिली व 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्या प्रस्तावाला 177 देशांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे 2015 साली 21 जूनला पहिल्यांदा योगदिन साजरा करण्यात आला. त्या दिवशी जगभरातल्या लाखो लोकांनी सामूहिकपणे योगाभ्यास केला होता.
advertisement
21 जून हाच दिवस योगदिन साजरा करण्यासाठी का निवडण्यात आला, यामागे विशेष कारण आहे. हा दिवस उत्तर गोलार्धातला सगळ्यात मोठा दिवस असतो. त्याला ग्रीष्म संक्रांत असंही म्हणतात. हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो. या दिवसानंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून त्याला खूप महत्त्व असतं. त्यामुळेच 21 जून हा दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला. दर वर्षी जागतिक योगदिनाची एक विशेष थीम असते. यंदाची थीम महिलांवर आधारित आहे. महिला सशक्तीकरणासाठी योग अशी 2024 साठी योगदिनाची थीम आहे.
योगदिनाचं औचित्य साधून जगभरात योगासनांचा प्रसार व प्रचार केला जातो. त्याचं महत्त्व ओळखून अनेक देशांमध्ये हा योग दिन साजरा केला जातो. सध्याची जीवनशैली व त्याचे परिणाम लक्षात घेता हळूहळू संपूर्ण जगाला योग साधनेचं महत्त्व पटू लागलेलं आहे.