शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही 40 वर्षांहून जुनी धोकादायक इमारत आहे. तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील दोन मजले निवासी वापर आहे. या इमारतीच्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील कुटुंब या ठिगाऱ्याखाली दबलं गेलं.
advertisement
स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ठिगाऱ्याखालून एकूण सात जणांना बाहेर काढलं. त्यापैकी तस्निम कौसर मोमीन (वय 8 महिने) आणि उझ्मा अब्दुल लतिफ मोमीन (वय 40 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतिफ मोमीन (वय 65 वर्ष) , फरजान लतिफ मोमीन (वय 50 वर्ष), बुशरा आतिफ मोमीन (वय 32 वर्ष), अदीमा लतिफ मोमीन (वय 7 वर्ष), उरूसा अतिफ मोमीन (वय 3 वर्षे) हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी अब्दुल लतिफ मोमीन यांची प्रकृती गंभीर असून अदीमा लतिफ मोमीन आणि उरूसा अतिफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत.
घटनास्थळी रात्री उशिरा पालिका आयुक्त अजय वैद्य दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. नक्की इमारत धोकादायक होती का? यावर काय कारवाई केली होती? याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.