गणपती उत्सव मंडपासमोर सकाळीच हजारो महिला पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या. त्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. त्यानंतर गणरायाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी इतर भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
advertisement
परदेशी अभिनेत्रीची उपस्थिती
पुणे शहराचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगात ख्याती आहे. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आणि अथर्वशीर्ष पठण सोहळ्याला इटलीची अभिनेत्री अॅना माराने देखील उपस्थिती दर्शवत सहभाग नोंदवला.
देखाव्याने पाडली भाविकांना भूरळ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आपल्या आकर्षक देखाव्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. यावर्षी ट्रस्टने केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारून भाविकांसाठी अनोखा नजारा निर्माण केला आहे. पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळ राज्याच्या तिरुअनंतपुरम येथे आहे. हे भगवान विष्णूंना समर्पित असलेलं अतिशय प्राचीन मंदिर आहे. याच मंदिराची तेजस्वी झलक यंदा पुण्यातील गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे. मंडपाची रचना अशी केली आहे की, भाविकांना लांबूनही बाप्पाचे दर्शन घेणं सहज शक्य होईल. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि अंतर्गत भागात आकर्षक विद्युत सजावटही केली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ही प्रतिकृती आणखीन देखणी भासते.





