विदर्भात हुडहुडी का वाढली?
उत्तर भारतातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे विदर्भ, नागपूर आणि लगतच्या भागांत थंडीची लाट पसरली आहे. सकाळी घराबाहेर पडताना दाट धुक्याचा सामना करावा लागत असून, दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. केवळ विदर्भच नाही, तर मराठवाड्याच्या काही भागातही रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. विदर्भ आणि छत्तीसगडच्या सीमेवर थंडीचे प्रमाण सर्वाधिक राहणार असल्याची माहिती डॉ. सुप्रीत कुमार यांनी दिली.
advertisement
हवामान तज्ज्ञ सुप्रीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे तयार झाला आहे. तर केरळच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यामुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात ढगाळ वातावरण राहू शकतं. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 अंशांनी ही वाढ होणार आहे.
पुढील ५ दिवस महत्त्वाचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तास तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर विदर्भातील थंडी अधिक तीव्र होईल. त्यानंतर ५ दिवसांनी हळूहळू तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होऊन थंडीचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल. सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने वातावरणात हा बदल पाहायला मिळत आहे.
वाहतूक आणि आरोग्यासाठी सूचना
दाट धुक्यामुळे महामार्गांवर प्रवास करताना मोठी जोखीम निर्माण झाली आहे. सकाळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी हाय-बीम ऐवजी 'फॉग लाईट्स'चा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. थंडीचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध आणि दमा किंवा श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना बसू शकतो. त्यामुळे अशा वातावरणात ऊबदार कपड्यांचा वापर करणे आणि शक्यतो पहाटे घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे.
मच्छिमारांना इशारा
अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने समुद्रात तूफानी वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मच्छिमारांनी दक्षिण अरबी समुद्र किंवा लक्षद्वीप परिसराकडे पुढील ५ दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, असा स्पष्ट इशारा हवामान विभागाने दिला आहे.
