अहमदनगर, 03 ऑगस्ट : पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. पण हरिश्चंद्र गडावर भर पावसात जाणे जीवावर बेतले आहे. प्रचंड पाऊस आणि धुक्यामुळे पुण्यातील सहा तरुण रस्ता भटकले होते. यातील एका तरुणाचा थंडी काकडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात ही घटना घडली आहे. बाळू नाथाराम गिते असं मयत पर्यटकाचे नाव आहे. अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले,महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सर्व जण पुण्यातील कोहगाव येथील रहिवासी आहे. मयत तरुण बाळू नाथाराम गिते हा लातूरचा राहणारा होता. सर्वजण पुण्यात कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. हरिश्चंद्र गडावर फिरायला आले होते. पुणे जिल्ह्यातून गड चढायला एक तारखेला संध्याकाळी पाच वाजता सुरूवात केली होती.
advertisement
(चेंडू आणण्यासाठी गेला पण परतलाच नाही; चिमुकल्याच्या मृत्यूनं बीड हादरलं!)
तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली होती. पण प्रचंड धुक्यामुळे हे तरुण रस्ता भरकटले. दोन दिवस हरिश्चंद्र गडाच्या जंगलात हे तरुण पावसात रस्ता शोधत होते. रस्ता भरकटल्याने सहा जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला होता. पण प्रचंड पाण्याचा मारा आणि त्यात थंडी वाजत असल्यामुळे बाळू गिते यांची प्रकृती खालावली. रात्रभर थंडीने काकडल्याने 2 ऑगस्टला बाळू गिते याचा मृत्यू झाला.
(शतपावलीसाठी गेले अन् घात झाला; पोलीस उपनिरीक्षकाच्या मृत्यूने पंढरपूर हादरलं!)
घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळाली. त्यानंतर याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली.
गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू केलं. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, या सहाही तरुणांना गडावर चढण्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती, पण तरीही त्यांनी धाडसं केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
