2009 साली शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा लढवणा-या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा दणदणीत पराभव केला होता. मात्र 2014 साली शिवबंधन तोडून काॅग्रेसकडून उमेदवारी मिळवणाऱ्या वाकचौरे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून श्रीरामपूरची आमदारकीही लढवली. मात्र तिथेही त्यांना अपयश आलं. तीच परीस्थिती 2019 ला झाली, शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानं ते अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. मात्र तिथेही त्यांचा पराभव झाला. दरम्यान आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदेंसोबत गेल्यानं, वाकचौरे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची चर्चा झाली असून येत्या 23 तारखेला ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
advertisement
राज्यात राजकीय समिकरणे बदलली असल्याने वाकचौरे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहील अशी खात्री असल्याने ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशाला मतदारसंघातील शिवसैनिकांकडून विरोध होत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या बैठकीत एकमताने वाकचौरे यांना विरोध करण्यात आलाय. दुसरीकडे काँग्रेसकडून देखील वाकचौरे यांना विरोध आहे. वाकचौरे यांना उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. त्यामुळे या सर्व विरोधाच्या पार्श्वभूमीवर वाकचौरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
