15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये शासकीय ध्वजारोहन पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, "जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तसेच येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून बीड अहिल्यानगर रेल्वे सरू करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडेल."
advertisement
युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसी यांच्या सहकार्याने सुमारे 196.98 कोटी रुपयांचा 'सीट्रीपलआयटी' हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचं नुकतंच भूमिपुजन झालं आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राच्या सुधारित 351 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचंही पवार म्हणाले.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जागा निश्चिती आणि पूर्वव्यवहार्यता चाचणीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे.
मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात अजित पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख आणि इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
