राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी पुण्यात होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांवर भाष्य केले. मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र, याआधीच सरकार पातळीवर या मुद्यावर तोडगा निघण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी म्हटले की, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर माझी भूमिका स्पष्ट आहे. कोणावरही भाषेची सक्ती होऊ नये. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क आहे. पाचवीपासून तिसरी भाषा असावी. तर, राज ठाकरे यांनी हाक दिलेल्या मोर्चाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, "मोर्चा काढण्याची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्रिभाषा धोरणावर सविस्तर चर्चा होणार असल्याचेही पवारांनी सांगितले. त्यामुळे मोर्च्याच्या आधीच काही सकारात्मक निर्णयाची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून, राज्य शासनाने पहिलीपासून त्रिभाषा सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. 'मराठी भाषा हीच प्राधान्याची भाषा असली पाहिजे,' अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे.
सरकारकडून त्रिभाषा धोरणावर लवकरच स्पष्ट भूमिका मांडली जाईल, आणि त्यामुळे 5 जुलैचा मोर्चा टळतो का, याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.