सगळीकडेच युती होऊ शकत नाही. त्यामुळे युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. यामुळे अजित पवार गट आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी महायुतीतून बाहेर पडू शकतो. स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज तिरोडा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश दिले.
advertisement
प्रफुल्ल पटेल नक्की काय म्हणाले?
कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, युतीचे जमले तर केले पाहिजे, नाही जमले तर सोडून दिले पाहिजे. हे असे आमचे धोरण ठरले आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही. प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल. युतीतील सर्व घटक पक्षाकडे उमेदवार असतील तरी आपल्या पक्षातल्या उमेदवाराला संधी न देणे, दुखावणे हे मला योग्य वाटत नाही, म्हणून जिथे सोयीचे वाटेल तिथे युती बघू. नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता पडते. त्यामुळे एखाद्यावेळी विचार करू, त्यामध्येही खात्री मी देत नाही.
पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्या ताकदीच्या हिशोबाने जागा मिळत असेल, तर आपण विचार करू. मागच्या वेळी कोणा दुसऱ्याकडे होता तर आताही त्यांच्याकडेच राहील, असे नाही. या नगरपालिकेमध्ये काही देण्याचे ठरलेले नाही. त्यामुळे माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण आज प्रत्येक प्रभाग आणि नगराध्यक्ष आपण लढणार आहोत. या हिशोबानेच आपण कामाला लागले पाहिजे. नाहीतर आपण गफलत मध्ये राहू, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.