आज सकाळी अजितदादांचं पार्थिव त्यांच्या काटेवाडी गावातील निवासस्थानी आणण्यात आले. अजितदादांच्या शेवटच्या दर्शनासाठी हजारो बारामतीकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर अजितदादांची ट्रकमधून अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे निघाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. तर, हजारोंची गर्दी मैदानावर उपस्थित होती.
पार्थ-जय यांनी केले विधी...
कायमच सक्रिय असणारे, वेळ पाळणारे आणि कामात व्यस्त असणाऱ्या अजितदादांचे पार्थिव मैदानात आल्यानंतर उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याआधीचे विधी पार्थ आणि जय यांनी केले. विधी पूर्ण झाल्यानंतर जय पवार हे अजितदादांचे पाया पडले आणि त्यांना मिठी मारली. मन हेलावणारे हे दृष्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.
advertisement
प्रचारासाठी निघाले अन् काळाने घात केला
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बुधवारी बारामतीला येणार होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाचा भीषण अपघात झाला आणि मोठ्या स्फोटात अजितदादांसह सहा जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर सर्वसामान्य जनताही सुन्न झाली आहे.
