महायुतीला भरघोस यश मिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या अंतिम निर्णयासाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार तसेच शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे गुरुवारी (आज) राजधानी दिल्लीत आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तिघांचीही चर्चा होणार आहे. चर्चेअंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नवी दिल्लीतील कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत आणि शुभेच्छा स्वीकारल्या. त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे देखील उपस्थित आहेत.
advertisement
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवू
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. दिल्लीत आपला नक्की विजय होईल. राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू, असे विधान राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
महाराष्ट्रात यश मिळाले, आता दिल्लीचा नंबर, विधानसभा लढण्याची घोषणा
तसेच अजित पवार यांनीही पत्रकार परिषदेतून दिल्ली विधानसभा लढविण्याची घोषणा केली. पक्षाचा गेलेला राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळविण्यासाठी आपण सारेजण प्रयत्न करू. आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, दिल्लीत लवकरच अधिवेशन घेऊ
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु तरीही कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोरदार प्रयत्न करून विधानसभेला सामोरे गेले. कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालून आपण जनतेसमोर प्रचार केला. महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन आजापर्यंतचे सर्वाधिक बहुमत दिले. त्यामुळे आम्हाला राज्यात जास्तीचे लक्ष घालावे लागेल. परंतु दिल्लीकडेही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. जसे मागे दिल्लीतील तालकटोरामध्ये अधिवेशन घेतले, तसे अधिवेशन डिसेंबरनंतर घेई, असे अजित पवार यांनी सांगितले.
अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल
अमित शाह यांच्याशी आज रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा होईल. या चर्चेत मुख्यमंत्रिपदाबरोबरच अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. चर्चेअंती मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
