पक्षात कोण नाराज?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचा सुर पुन्हा एकदा समोर आला आहे. पक्षातील काही माजी आमदार नेतृत्वाच्या भूमिकेवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे आणि सुनील टिंगरे या माजी आमदारांनी पक्षाच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
advertisement
आम्हाला वाळीत टाकलंय का? संतप्त सवाल...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माजी आमदारांना पक्षाच्या कोणत्याही बैठकीत त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. इतकंच नाही, तर त्यांच्यावर कोणतीही जबाबदारीही सोपवली जात नसल्याने हे माजी आमदार स्वतःला उपेक्षित समजू लागले आहेत. अनेक वर्षे पक्षासाठी काम केल्यानंतर आज पक्षाकडून अशी वागणूक मिळावी, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
पक्षात अलीकडे प्रवेश केलेल्या नेत्यांना मान-सन्मान दिला जातो, त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. मात्र, जे माजी आमदार संकटाच्या काळातही पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्याकडे पाठ फिरवली जात असल्याची खंत या माजी आमदारांनी व्यक्त केली आहे. "आम्ही संकटात पक्ष सोडला नाही, पण आता पक्षानेच आम्हाला विसरलं का?" असा सवाल त्यांनी केला आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत कलह उफाळून येण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षाला भोवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.