खरं तर, बिहार विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तिथे भाजपसह, काँग्रेस, आरजेडी आणि जनता दल संयुक्त असे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. बिहारमध्ये इंडिया आणि एनडीए आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहारमधील काही जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.
advertisement
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशातील एनडीए (NDA) चा घटकपक्ष असला तरी, बिहारमध्ये मात्र ते एकट्याने निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पक्षाकडून सध्या बिहारमधील कोणत्या जागांवर निवडणूक लढवता येईल, याची चाचपणी सुरू आहे. राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि त्यांच्या मताचा विचार करून किती जागा लढवायच्या, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु, प्रत्येक राज्यात राजकीय परिस्थिती वेगवेगळी असल्याने त्यांनी बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात आणखी एक नवीन पक्ष स्पर्धेत उतरणार आहे, ज्यामुळे निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.