शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेऊन पक्षात जान फुंकली. भारतीय जनता पक्षानेही मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून 'मुंबई आपलीच' असा नारा दिला. पाठोपाठ अजित पवार यांच्या पक्षाचेही नागपुरात शिबिर सुरू आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. प्रफुल पटेल यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना ही घोषणा केली.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होते, म्हणून मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढणार
पक्ष वाढवायचा म्हटल्यावर निवडणुकांत अनेकांना संधी द्यावी लागते. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच खऱ्या अर्थाने पक्षवाढ होत असते. त्यामुळे मुंबई वगळता आमचा पक्षाने उर्वरित महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात पण आम्ही पक्ष स्तरावरून महायुती म्हणूनच लढा, असे आदेश देणार नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे लक्ष नाही- प्रफुल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सरकारमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या उत्तम समन्वयाने सरकार व्यवस्थित काम करते आहे. राष्ट्रवादीचे आठ मंत्री सरकारमध्ये आहेत. पण संबंधित मंत्र्यांचे हवे तेवढे लक्ष पक्षसंघटनेकडे नाही, अशी तक्रार खुद्द पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बोलून दाखवली. नागपुरात सुरू असलेल्या शिबिरात मंत्र्यांना पक्षसंटनेकडे लक्ष द्यावेच लागेल, असेच प्रफुल पटेल यांनी एकाअर्थी सुचवले आहे.