त्या ट्विटमध्ये पवार यांनी महिला सशक्तीकरणाचा मुद्दा अधोरेखित करताना म्हटले होते, “आपण हेलिकॉप्टर किंवा विमानाने प्रवास करताना लँडिंग अगदी स्मूथ झाली, तर आपल्याला समजते की पायलट महिला आहे.” हा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सशक्तीकरणाच्या भूमिकेच्या संदर्भात देण्यात आला होता.
आज अजितदादांच्या अपघातानंतर त्यांचे हे ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या विमानात कॅप्टन सुमित कपूर आणि सांभवी पाठक हे दोन पायलट होते. कॅप्टन कपूर यांना सुमारे 16,000 तासांचा उड्डाणाचा अनुभव असल्याची माहिती देण्यात आली आहे.
VSR Aviationचे वरिष्ठ अधिकारी व्ही. के. सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही पायलट दिल्लीस्थित होते आणि त्यांचा उड्डाणाचा अनुभव मोठा होता. “आमच्या माहितीनुसार विमान पूर्णपणे फिट होते. कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमानाची देखभाल अत्यंत चांगली करण्यात आली होती,” असे सिंग यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक माहितीनुसार, दृश्यमानता कमी असणे (poor visibility) हा अपघातामागील संभाव्य घटक असू शकतो, असेही त्यांनी सांगितले. “पायलटने प्रथम रनवेवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र दृश्यता न मिळाल्याने ‘मिस्ड अप्रोच’ घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. रनवे दिसत नसेल, तर मिस्ड अप्रोच घेणे ही मानक प्रक्रिया असते,” असे सिंग म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, कॅप्टन कपूर यांना 16,000 तासांहून अधिक अनुभव होता, तर सह-पायलटला सुमारे 1,500 तासांचा फ्लाइंग अनुभव होता.
