बारामती 'दादां'च्या आठवणीत हळहळली
बुधवार, २८ जानेवारी रोजी झालेल्या या भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. गुरुवारी बारामतीमध्ये हजारो समर्थकांनी 'अजित दादा अमर रहे'च्या घोषणा देत आपल्या नेत्याला निरोप दिला. या दुःखद प्रसंगी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून जनजीवन अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाही.
advertisement
राज्य सरकारकडून CID चौकशीचे आदेश
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर सरकारने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या अपघातातील गूढ उलगडण्याची आणखी दाट शक्यता आहे. बारामती पोलिसांनी अपघातस्थळाची तटबंदी केली असून, कोणालाही तिथे प्रवेश करण्यास मनाई आहे. फॉरेन्सिक पथकाने विमानाचे अवशेष आणि जळालेल्या भागांचे नमुने आधीच ताब्यात घेतले आहेत. बारामती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 'अकस्मात मृत्यू' (ADR) अहवालाच्या आधारे आता सीआयडी सखोल तपास करणार आहे.
हे मु्द्दे ठरणार कळीचे?
सीआयडी तपासात आता वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामानातील अचानक बदल आणि एटीसीशी झालेला शेवटचा संवाद यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या एका महत्त्वाच्या नेत्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने यामागे काही घातपात तर नाही ना, या दिशेनेही सर्व शक्यता तपासून पाहिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.
