दुर्दैवी विमान अपघातानंतर राजकीय आणि नागरी वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित विमान ज्या कंपनीचे आहे, त्या 'व्हीएसआर एव्हिएशन' (VSR Aviation) चे मालक व्ही. के. सिंह यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय त्यांनी फेटाळून लावला आहे.
खरंच विमानात बिघाड होता?
अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमान दुरुस्त नसल्याची चर्चा सुरू झाली. विमानाच्या फिटनेसवरही सवाल उपस्थित होऊ लागले होते. या सगळ्या चर्चांवर व्ही.के. सिंह यांनी भाष्य केले. व्ही. के. सिंह म्हणाले की, "आमच्या माहितीनुसार आणि रेकॉर्डनुसार, हे विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त (Fit) होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही."
advertisement
अपघाताचं नेमकं कारण काय?
अपघाताच्या कारणाबाबत बोलताना त्यांनी हवामानाकडे बोट दाखवले आहे. "प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी त्या परिसरात दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. धुक्यामुळे किंवा खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नसावा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) चौकशीनंतरच स्पष्ट होईल," असे सिंह यांनी स्पष्ट केले.
DGCA कडून सखोल चौकशी सुरू
या भीषण अपघाताची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून DGCA कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' आणि तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कंपनी प्रशासनाने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.
