मोहोळ तालुक्यातील जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेल्या पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली होती. भेटीदरम्यान दादांनी शाळेला अडीच एकर जमीन देण्याचं आश्वासन मुख्याध्यापकांना दिलं होतं. भेटीदरम्यान वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची आणि गुणवत्तेची उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली होती. अगदी स्वतः गणिताचे प्रश्न देखील विद्यार्थ्यांना विचारले होते. यावेळी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळेने घेतलेल्या मेहनतीचे देखील त्यांनी कौतुक केले होते.
advertisement
अजितदादांनी दिला होता शब्द
अजितदादांनी दिलेल्या अडीच एकर जागेवर नव्याने वर्ग खोल्या बांधण्यात आल्या आहेत. त्या वर्गखोल्यांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, अशी गावकरी आणि शाळा व्यवस्थापनाची इच्छा होती. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी 15 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उद्घाटनाचे निमंत्रण दिलं होतं. तेव्हा अजितदादांनी लवकरच येऊन उद्घाटन करू, असा शब्द त्यांनी दिल्याचं गावकरी पद्माकर भोसले-पाटील यांनी सांगितलं.
अजितदादांचं पापरीच्या शाळेवर खूप प्रेम होतं. शाळेच्या संदर्भात कोणतेही काम त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर दादांनी कधीही नाही म्हटलं नाही. अधिकाऱ्यांना फोन करून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश ते देत होते. पण अजितदादांचे अपघाती निधन झाल्याने महाराष्ट्रासह पापरी गावात देखील शोककळा पसरली आहे. अजितदादा जरी जग सोडून गेले असले तरी त्यांनी गावासाठी केलेलं काम कधीही विसरू शकत नाही, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.





