अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आज बारामतीत दाखल होणार होते. त्यांच्या एकूण तीन सभा होत्या. मात्र विमान लँडिंगच्या वेळी अचानक अपघात झाला. डीजीसीएकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानाचे वैमानिक आणि इतर सहकाऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला आहे.
advertisement
असा नेता पुन्हा होणे नाही..
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते आज भावूक झाले आहेत. अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. आमचा दादा गेला, आता आम्हाला वाली कोण? अशा शब्दांत कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
अजितदादा पुण्यात किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये आले की ते आवर्जून छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांची भेट घेत असत. पक्षातील पद काहीही असो, प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत असत, त्यांच्या अडचणी ऐकून घेत त्यांना मार्गदर्शनही करत होते. त्यांच्या आज अचानक जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून परिसरात शोककळा पसरलेली पाहायला मिळत आहे.





