महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पुन्हा एकदा 'एकत्र' येण्याच्या हालचाली केवळ चर्चा नसून, त्यावर खुद्द राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खल झाला होता, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे. "जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की विलीनीकरणाचा अंतिम निर्णय घेऊ," असा शब्द अजितदादांनी दिला होता, असा दावा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.
advertisement
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होणार होतं विलिनीकरण...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी बोलताना महत्त्वाचं भाष्य केलं. त्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी इच्छा अजित पवारांची देखील होती. आमच्या बैठकादेखील पार पडल्याचे पाटील यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका आणि इतर महापालिकांमध्ये एकत्र लढले होते. जिल्हा परिषद निवडणूकदेखील आम्ही एकत्र लढलो. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूकही एकत्र लढत असल्याचे त्यांनी म्हटले.
दादांच्या राजकीय निर्णयाचं काय?
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी विलीनीकरणाबाबत जे पाऊल उचलले होते, ते आता पूर्णत्वास जाणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. "दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी अजित पवारांची मनापासून इच्छा होती.' असे जयंत पाटील यांनी म्हटले.
आता दादांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांच्या खांद्यावर आली आहे. अजितदादांनी पाहिलेले 'एकसंध राष्ट्रवादी'चे स्वप्न त्यांचे कुटुंब पूर्ण करणार का, याकडे कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.
पक्षांतर्गत विरोधाचा अडथळा दूर होणार?
अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांचा या विलीनीकरणाला तीव्र विरोध होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे. मात्र, आता नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्यास, त्या आपल्या पतीची शेवटची राजकीय इच्छा म्हणून विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारू शकतात. जर असे झाले, तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा 'पवार पॅटर्न'ची मोठी ताकद पाहायला मिळू शकते.
