अकोला महापालिकेत ३८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आता बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली जुळवाजुळव पूर्ण केली आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह मित्रपक्षांच्या नगरसेवकांची गटनोंदणी करण्यासाठी दाखल झाला आहे.
अकोला महापालिकेत एकूण ८० जागा असून बहुमतासाठी ४१ हा आकडा आवश्यक आहे. भाजपकडे स्वतःचे ३८ नगरसेवक आहेत. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यावर ४४ नगरसेवकांचा गट तयार केल्याचा दावा केला आहे.
advertisement
भाजपने मांडलेले संख्याबळ:
भाजप: ३८
राष्ट्रवादी (शरद पवार गट): ०३
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०१
शिवसेना (शिंदे गट): ०१
अपक्ष: ०१
एकूण: ४४
विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी सुरू
अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी भाजपचे प्रमुख नेते आणि नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. शरद पवार गटाच्या ३ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
महाविकास आघाडीचे प्रयत्न अपयशी?
दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने देखील सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाजपने 'शहर सुधार आघाडी'च्या माध्यमातून मित्रपक्षांना सोबत घेत बहुमताचा ४१ चा आकडा पार केल्याने अकोला महापालिकेवर भाजपचाच महापौर बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
