दरम्यान विनोद तावडे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच आपलं हितेंद्र ठाकूर यांच्याशी बोलणं झालं आहे. भाजप नेत्याने टिप दिली , हे हितेंद्र ठाकूर म्हणाल्याचं धादांत खोटं आहे, नंतर मी त्यांच्यासोबत गाडीने गेलो, ते काय म्हणाले हे मला माहिती आहे, असं विनोद तावडे म्हणाले आहेत. तसंच ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र हे मी आधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रियाही तावडेंनी दिली आहे.
advertisement
काय म्हणाले विनोद तावडे?
'इतकं वाईट वाटतं, मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही. मी हितेंद्र ठाकूर यांचं मत विधानपरिषदेत मिळवलं आहे. मला बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर यांनीच सोडलं आहे, त्यामुळे त्यांना शंका आली असेल, त्यांनी केलं असेल. निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी', असं विनोद तावडे म्हणाले आहेत.
'तिकडे तीन एफआयआर दर्ज झाले, एक आम्ही दोघांनी पत्रकार परिषद घेतली याचा दर्ज झाला. दुसरा माझा मतदारसंघ नसताना तिकडे गेलो म्हणून दर्ज झाला. हितेंद्र ठाकूर यांचं मतदारसंघ नसताना तिकडे आले, हा तिसरा एफआयआर. पैशाचा एकही एफआयआर नाही, पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत', असं स्पष्टीकरण तावडेंनी दिलं आहे.
'भाजपच्या नेत्याने टिप दिली, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले हे धादांत खोटं आहे. नंतर गाडीतून जाताना ते मला काय म्हणाले हे माहिती आहे, त्यामुळे यात काहीही तथ्य नाही. कोणती टीप नव्हतीच तर कशी टीप देणार?' असा सवाल विनोद तावडेंनी विचारला आहे.
'प्रचार संपल्यानंतर मी लोकांना भेटायला जात असतो. मला तिथल्या भाजप नेत्यांनी चहाला बोलावलं म्हणून मी गेलो. मी गेल्या 25 निवडणुकांमध्ये हे करत आलो आहे. युती असताना मी आणि उद्धवजीही शाखांमध्ये फिरलो आहे. हे सगळे करतात. तरी शंका आली आहे ना, पैसे तपासा, हॉटेलचं सीसीटीव्ही तपासा. माझं काहीही म्हणणं नाही', असंही तावडे म्हणाले.
'मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीबाबत मी आधीही म्हणलं आहे, ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र. मी तिकडे जाणार आहे, पक्षातही कुणाला माहिती नव्हतं, त्यामुळे असा काही विषय नाही. माझी प्रतिमा मलीन व्हायचं कारण नाही, जो कार्यकर्ता दिवसरात्र मरमर काम करतो, त्याला भेटायला विनोद तावडे आले. 40 वर्षात एक दमडी वाटली नाही', असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं आहे.
