नेमका प्रकार काय?
अंबरनाथ पश्चिम भागातील मातोश्रीनगर परिसरात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याची माहिती शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीवरून शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काही वेळातच या वादाचं रूपांतर मोठ्या गोंधळात झालं. नागरिकही मोठ्या संख्येनं जमा झाले.
advertisement
पोलिसांचा लाठीचार्ज आणि परिस्थिती नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईनंतर जमाव पांगला असून सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिंदे गट-भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी कांटे की टक्कर
अंबरनाथ नगरपालिकेच्या या निवडणुकीत महायुतीमधील दोन मित्रपक्ष म्हणजेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप यांच्यातच थेट लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यामुळे सुरुवातीपासून अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरत होती. आता मतदानाच्या दिवशी देखील राडा झाला आहे.
