मंगळवारची ती सकाळ इतर दिवसांसारखीच कामाच्या गडबडीत सुरू झाली होती. टर्पेंटाईनच्या बाटल्या भरण्याचं काम अगदी वेगात सुरू होतं. अर्ध्या-पाऊण तासात नशिबाने असं काही वळण घेतलं की, संपूर्ण फॅक्टरीत आगीचं तांडव सुरू झाला. आगीच्या ज्वाळा आणि टर्पेंटाईनचा भडका इतका भीषण होता की, कोणाला काही समजायच्या आत सगळीकडे धुराचे लोट पसरले. सोबत असलेल्या सहा मैत्रिणी नशिबाने एका बाजूने बाहेर पडू शकल्या, पण मोनालीचं नशीब मात्र जोरावर नव्हतं.
advertisement
मोनाली ज्या ठिकाणी उभी होती तिथलं शटर बंद होतं. "आम्ही तिला वाचवण्यासाठी ओरडत होतो, पण आगीच्या झळा प्रचंड होत्या आणि तिच्या बाजूला असलेलं शटरही बंद होतं. आम्हाला काहीच करता आलं नाही," असं सांगताना तिच्या सोबत काम करणाऱ्या प्रतिभा राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. सहा मैत्रिणींच्या डोळ्यादेखत ही होरपळत होती पण तिला वाचवण्यासाठी पुढे येणं आगीमुळे कुणालाच शक्य झालं नाही.
या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त भीषण काही असेल, तर ते म्हणजे मोनालीचे पती सुनील यांना बसलेला धक्का. ते सुद्धा त्याच फॅक्टरीत दुसऱ्या बाजूला काम करत होते. आग लागल्याचं कळताच ते जीवाच्या आकांताने पत्नीकडे धावले, पण नियतीने त्यांनाही हतबल केलं होतं. पत्नी आगीच्या विळख्यात आहे हे डोळ्यांना दिसत होतं, पण तो मृत्यूचा सापळा तोडणं त्यांना शक्य झालं नाही. केवळ पंधरा दिवसांपूर्वी हे दाम्पत्य संसाराला हातभार लावण्यासाठी इथे आलं होतं, पण एका बंद शटरने मोनालीची आयुष्याची दारेच कायमची बंद करून टाकली.
अमरावतीच्या एमआयडीसीमध्ये मंगळवारी सकाळी ही आग लागली. त्यानंतर प्रशासन आणि फॅक्ट्रीच्या मालकांवर संताप व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञच्या मते, टर्पेंटाईन आपोआप पेटत नाही, पण एकदा पेटलं की ते थांबवणं अशक्य असतं. मग ही ठिणगी पडली कुठून? फॅक्टरीमध्ये सुरक्षेची साधनं का नव्हती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कामाच्या वेळी बाहेर पडण्याचं शटर बंद का होतं? नियम पाळले गेले नव्हते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
