अमरावती - अमरावती शहर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. यात आणखी भर पडणे सुरूच आहे. पण अमरावतीमधील वडाळी परिसरात असलेल्या बांबू उद्यानाला काही जोडच नाही. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि विविधतेने नटलेले हे बांबू उद्यान आहे. सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. बांबू उद्यानाबाबत संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
49 एकरमध्ये पसरले बांबू उद्यान -
अमरावतीमधील वडाळी परिसरात बांबू उद्यान आहे. हे महाराष्ट्र वनविभागाकडून विकसित करण्यात आले आहे. हे उद्यान 49 एकर जागेवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये बांबूच्या 65 प्रजाती आहेत. या बागेत बांबूपासून बनवलेली झोपडी, बांबू पासून बनवलेला पुल यासारख्या अनेक बाबी आहेत. या ठिकाणी कॅक्टसच्या सुद्धा वेगवेगळ्या 300 हून अधिक प्रजाती आपल्याला बघायला मिळतात.
लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उत्तम सुविधा -
बांबू उद्यानात जिकडे तिकडे संपूर्ण परिसर हिरवागार आहे. या बागेत लहान मुलांकरिता सुद्धा अनेक खेळणी उपलब्ध आहे. मैदानी खेळासाठी सुद्धा जागा उपलब्ध आहे. बांबू उद्यान हे अमरावती मधील सर्वोत्तम पिकनिक पॉइंट आहे.
बांबू उद्यानाची वेळ -
बांबू गार्डन म्हणजे बांबू उद्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत खुले असते. मंगळवार ते रविवार हे उद्यान दिलेल्या वेळेत सुरू असते. सोमवारी बंद ठेवण्यात येते. या उद्यानात पिकनिकसाठी जायचे असल्यास 30 रुपये प्रत्येक व्यक्ती अशी फी द्यावी लागते. त्याची पावती आपल्याला मिळते.
फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण -
आतमध्ये गेल्यानंतर विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. ज्यांना फोटोग्राफीची अत्यंत आवड आहे त्यांच्यासाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहे. कोणताही इफेक्ट न देता एकदम नॅचरल फोटो तुम्हाला मिळतात. खुले आकाश, वाहणारा झरा, हिरवीगार झाडे या सर्व वातावरणात फोटो घेण्याची मज्जाच वेगळी ठरते. कुटुंबासोबत पिकनिकसाठी सुद्धा हे बेस्ट ऑप्शन ठरू शकते. शनिवार आणि रविवार तुम्ही इथे आरामात वेळ घालवू शकता.